विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या पिता-पुत्रांचा पाण्याच्या प्रवाहात तोल गेला; तरुणाचा मृत्यू, वडिलांना वाचविण्यात यश
संगमेश्वर : गणपती विसर्जनाचा उत्साह सुरू असतानाच माभळे येथील बावनदीच्या पात्रात काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली. गणरायाच्या विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या पिता-पुत्रांचा पाण्याच्या जोरदार प्रवाहात तोल गेला. वडिलांना ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढले; मात्र २२ वर्षीय प्रज्वल पुरुषोत्तम घडशी याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने माभळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम घडशी आणि त्यांचा मुलगा प्रज्वल हे कुटुंबीय तसेच वाडीतील नागरिकांसोबत गणपती विसर्जनासाठी संगमेश्वर पोलिस ठाण्यासमोरील बावनदीच्या काठावर गेले होते. सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास गणपती विसर्जन सुरू असताना दोघेही नदीपात्रात उतरले. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही अचानक पाण्यात बुडाले.
पिता-पुत्र बुडत असल्याचे लक्षात येताच गुणाजी घडशी आणि दत्ताराम घडशी यांनी मदतीसाठी धाव घेतली. यावेळी प्रज्वलने गुणाजी यांचा हात पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र नदीच्या जोरदार प्रवाहामुळे त्याचा हात सुटला आणि तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला.
दरम्यान, श्रीकांत घडशी यांनी नदीत उडी घेत पुरुषोत्तम घडशी यांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर ग्रामस्थ आणि स्थानिक युवकांनी प्रज्वलचा नदीपात्रात शोध सुरू केला. सुमारे २० मिनिटांच्या शोधानंतर प्रज्वल पाण्यात आढळून आला. त्याला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी नेण्यात आले; मात्र बराच वेळ पाण्यात बुडाल्याने डॉक्टरांना त्याचे प्राण वाचविता आले नाहीत.
या दुर्घटनेमुळे माभळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गणपती विसर्जनाच्या ठिकाणी सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना कराव्यात, तसेच नदीपात्रातील धोकादायक ठिकाणे आणि खोल खड्ड्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
नदीपात्रातील खड्ड्यांमुळे दुर्घटना झाल्याचा आरोप
या घटनेनंतर गुणाजी घडशी यांनी नदीपात्रातील खोल खड्ड्यांबाबत संताप व्यक्त केला. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाशी संबंधित ठेकेदार कंपनीने काही दिवसांपूर्वी गाळ उपशाच्या नावाखाली नदीपात्रात मोठे खड्डे केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पूर्वी सपाट असलेल्या भागात हे खड्डे निर्माण झाल्यामुळे पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज येत नसल्याचे त्यांनी सांगितले. या खड्ड्यांबाबत संबंधित ठेकेदार कंपनीला वारंवार सूचना करूनही ते बुजविण्यात आले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. नदीपात्रातील याच खड्ड्यांमुळे आपल्या नातवाचा जीव गेल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदार कंपनीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी घडशी यांनी केली आहे.