For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोडामार्गला अखेर अनर्थ घडलाच

03:40 PM Apr 09, 2025 IST | Radhika Patil
दोडामार्गला अखेर अनर्थ घडलाच
Advertisement

दोडामार्ग : 

Advertisement

प्रचंड नुकसानीबरोबरच दोडामार्ग तालुक्यातील जनतेला जी त्याहून मोठी भीती होती, ती मंगळवारी सकाळी खरी ठरली. तालुक्यातील मोर्ले गावातील लक्ष्मण यशवंत गवस या 70 वर्षीय शेतकऱ्यास एका रानटी हत्तीने पायाखाली तुडवत ठार मारलं. मंगळवारी भल्या सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. ही घटना समजताच तालुक्यासह संपूर्ण जिल्हा हादरून गेला.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या मोर्ले तसेच तालुक्यातील ग्रामस्थांनी वनविभागाला धारेवर धरत घटनास्थळीच ठिय्या मांडला. यावेळी कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आम्हाला हती पकड मोहीम राबविणार, याबाबतचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे पत्र मिळायलाच हवे अन्यथा आम्ही ठिय्या मागे घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत सायंकाळी उशिरापर्यंत ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन सुरुच होते.

Advertisement

लक्ष्मण गवस हे नेहमीप्रमाणे सकाळी त्यांच्या शेतामध्ये गेले होते. एक तास उलटूनही ते घरी न परतल्याने त्यांचे बंधू रमाकांत गवस हे त्यांना पाहण्यासाठी जात असता वाटेतील ‘झरी’ येथील ‘पायरी’च्या झाडाखाली एक व्यक्ती पडल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता ती व्यक्ती आपला भाऊच असल्याचे पाहून ते हादरले व अक्षरश: ओरडले. त्यांचा आवाज ऐकून लगतच्या शेतीत असलेल्या इतर शेतकऱ्यांनी तेथे धाव घेतली.
यावेळी त्यांना मृतावस्थेत पडलेल्या लक्ष्मण गवस यांच्या आसपास हत्तीच्या पाऊलखुणा दिसल्या
. शिवाय लक्ष्मण गवस यांच्या उजव्या हातावर पाय ठेवल्याने तो मोडलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यामुळे हत्तीनेच त्यांना ठार केल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. तसेच हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागानेही वर्तविला. घटनेची माहिती वनविभागाला देताच वन अधिकारी, कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. लक्ष्मण गवस यांच्या पश्चात भाऊ, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.

  • उपवनसंरक्षकांसह वनाधिकाऱ्यांवर प्रचंड रोष

या घटनेची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर वनक्षेत्रपाल वैशाली मंडळ व अन्य अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी या अधिकाऱ्यांवर प्रचंड रोष व्यक्त करीत प्रश्नांची अक्षरश: सरबत्ती केली. मात्र ग्रामस्थांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर वनक्षेत्रपाल मंडळ यांना देता आले नाही. त्यांनी गप्प राहणेच पसंत केले. त्यानंतर घटनास्थळी उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी व सहाय्यक उपवनसंरक्षक सुनील लाड दाखल झाले. त्यांनाही प्रश्नांच्या भडीमारास सामोरे जावे लागले. ‘आज आमच्या गावातील एक ग्रामस्थ मृत्युमुखी पडला आहे. आमच्यातील एक व्यक्ती आज हत्तीच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहे. तुम्हाला त्याचे काही सोयरसुतक नाही. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून हत्ती पकड मोहीम राबवा, असे सांगत आहोत. मात्र तुम्ही काय केले? असा सवाल ग्रामस्थांनी केला. तुम्ही फक्त अभ्यास करीत आहोत. प्रस्ताव पाठविला. ह्या उपाययोजना केल्या, त्या उपाययोजना केल्या, एवढेच सांगत आहात. मात्र प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे आमचा आता तुमच्यावर विश्वासच नाही, असे ग्रामस्थांनी उपवनसंरक्षकांना सुनावले.

  • आजच्या मृत्यूला वनविभाग जबाबदार

आम्ही मागील 20 वर्षांपेक्षा जास्त कालावधी हत्ती पकड मोहीम राबवा, असे सांगत होतो. यासाठी आम्ही अनेक उपोषणे केली. आंदोलने केली. तुम्ही फक्त कोरडी आश्वासने दिली. प्रत्यक्षात कारवाई काहीच केली नाही. त्यामुळे वनविभागाच्या नाकर्तेपणामुळे आजचा हा बळी गेला, असेही ग्रामस्थांनी सुनावले. यावेळी पोलीस उपअधीक्षक कृषिकेश रावले, पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, परिविक्षाधीन प्रांताधिकारी लक्ष्मण कसेकर, प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांच्यासह पोलीस व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच सरपंच सेवासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, सरपंच संजना धुमास्कर, गोपाळ गवस, संतोष मोर्ये, मदन राणे, प्रथमेश गवस, पंकज गवस, रमेश गवस यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.