यंदे खुटवरील ट्रॅफिक सिग्नल बंदच
अधिवेशनापूर्वी सिग्नल सुरू करण्याची मागणी : सिग्नल नसल्याने वाहनांची प्रचंड कोंडी
बेळगाव : यंदे खूट येथील ट्रॅफिक सिग्नल कोसळून अनेक महिने उलटले तरी अद्याप त्या ठिकाणी नवा सिग्नल बसविण्यात आलेला नाही. सिग्नल नसल्याने यंदे खूट परिसरामध्ये वाहनांची प्रचंड कोंडी होत आहे. सकाळी व संध्याकाळी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्यावेळी वाहनांच्या रांगाच रांगा लागत आहेत. त्यामुळे किमान अधिवेशनापूर्वी तरी हा सिग्नल बसविला जाणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. परतीच्या वादळी पावसामुळे यंदे खूट येथील ट्रॅफिक सिग्नल काही महिन्यांपूर्वी कोसळला. या चौकात चार महत्त्वाचे रस्ते एकत्रित येत असल्याने वाहनांची नेहमीच वर्दळ असते. कोकण, चंदगड तसेच ग्रामीण भागातील नागरिक युनियन जिमखाना रोडमार्गे शहरात येतात.
तर दुसरा रस्ता कॉलेज रोडमार्गे धर्मवीर संभाजी चौकात जातो. समादेवी गल्लीत जाण्यासाठी याच चौकातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सिग्नल कोसळून अनेक दिवस उलटले तरी त्या ठिकाणी नवा सिग्नल बसविण्यात आलेला नाही. विशेषत: अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ बेळगावमध्ये दाखल होतात. अशावेळी सिग्नल नसल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. सध्या या ठिकाणी रहदारी पोलिसांची नेमणूक करण्यात आली असली तरी गर्दीच्यावेळी वाहतूक नियंत्रित करणे अवघड होत असल्याने या ठिकाणी अधिवेशनापूर्वी तरी सिग्नल बसविला जावा, अशी मागणी होत आहे.