For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन आवश्यक

10:55 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन आवश्यक
Advertisement

जिल्हाधिकारी नितेश पाटील : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मासची सांगता

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेक कुटुंबांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजेत. तरच अपघात टाळता येतात, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, वाहतूक आणि पोलीस व शिक्षण खात्याच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय रस्ते सुरक्षा मास 2024 च्या सांगता समारंभात ते बोलत होते. कन्नड साहित्य भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ते म्हणाले, वाहने चालविताना ओव्हरटेक करणे आणि नियमांचे पालन न केल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. वाहनधारकांनी नियमांचे पालन करत सुरक्षा सुविधांचा वापर केल्यास अपघातांचे प्रमाण घटविणे शक्य आहे. जिल्ह्यामध्ये 1064 अपघात घडले आहेत. यासाठी सुरक्षा साधनांशिवाय वाहने चालवू नये, असे त्यांनी सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी वाहने, ऑटो रिक्षा, बसेस क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण करीत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. रस्त्यांच्या असुरक्षिततेमुळे अपघात घडत असून अपघात घडणाऱ्या रस्त्यांची ओळख पटवून त्याठिकाणी सुरक्षा उपाययोजना राबविल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले, प्रत्येकाने रस्ते वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. हेल्मेट परिधान केले पाहिजे. चार चाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट वापरला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी सेवानिवृत्त पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामाप्पा यांनी हिरवे निशान दाखवून जनजागृती रॅलीचे उद्घाटन केले. सदर रॅलीला चन्नम्मा चौकातून प्रारंभ होऊन रॅली कोल्हापूर सर्कलमधून परत चन्नम्मा चौकात आली. यावेळी बेळगाव वाहतूक विभागाचे साहाय्यक आयुक्त एम. पी. ओमकारेश्वरी, बेळगाव विभागीय वाहतूक खात्याचे अधिकारी नागेश मुंडस्, महेश विजापुरे, बेळगाव सीटीई महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी, वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.