For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केळ्यालाही वाहतुकीचे नियम

06:04 AM Jun 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
केळ्यालाही वाहतुकीचे नियम
Advertisement

ही अमेरिकेतील एक बहुचर्चित घटना आहे. या देशातील मोंटाना येथे एका कल्पक व्यक्तीने केळ्याच्या आकाराची कार बनविली. या कारमधून तो आपल्या मित्रमंडळींसह प्रवास करत असताना महामार्गावर वाहतूक पोलिसांनी ही कार आडवली. अशा प्रकारची कार महामार्गावर चालविण्याची अनुमती नाही, हा नियम त्याला समजावून देण्यात आला. केवळ वाहनांनाच नव्हे, तर केळ्यांनाही वाहतुकीचे नियम लागू होतात, असे या कारच्या चालकावर कारवाई करताना वाहतूक पोलिसांनी विनोदाने समजावून दिले. सध्या हा त्या भागात चर्चेचा विषय आहे.

Advertisement

अर्थात, या कारचालकाने मोठा गंभीर अपराध केला नव्हता. त्यामुळे त्याला केवळ समज देऊन सोडून देण्यात आले. त्याची दंड भरण्यापासून सुटका झाली. तथापि, ही घटना सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाल्याने ही कार लोकांच्या बोलण्याचा विषय बनली आहे. या कारच्या मालकाचे नाव स्टीव्ह ब्रेथवेट असे आहे. त्याने 2011 मध्ये एका पिक अप वाहनाच्या बॉडीला केळ्याचा आकार देऊन ही कार बनविली आहे. हे पिक अप वाहन 1993 चे आहे. या कारची इतर रचना कोणत्याही सर्वसामान्य कारसारखीच आहे. तथापि, तिच्या मुख्य भागाचा आकार पिकलेल्या मोठ्या केळ्यासारखा आहे. या कारला नेहमीसारखे चार दरवाजे आहेत. सर्व दरवाजे मिटविल्यावर ती आडव्या ठेवलेल्या केळ्यासारखी दिसते. तिचा रंग पिकलेल्या केळ्यासारखाच आहे. तिचा वरचा भाग उघडता येतो आणि या कारमध्ये सहा माणसे बसू शकतात. प्रारंभीच्या काळात या कारचा उपयोग ब्रेथवेट यांनी स्वत:च्या जाहीरात व्यवयसायाच्या जाहीरातीसाठी केला होता. तथापि, आता त्यांनी आपला व्यवसाय गुंडाळत आणला आहे. आपली पुष्कळशी व्यावसायिक साधनसामग्री त्यांनी विकली असून उरलेली आपल्या स्टोअरमध्ये ठेवली आहे.

सध्या ते आपल्या या ‘बनाना कार’ मधून आपल्या कुटुंबियांसमवेत संपूर्ण अमेरिका बघण्यासाठी प्रवास करीत आहेत. आतापर्यंत त्यांची कार काही वेळा पोलिसांनी आडवली आहे. अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये अशा ‘फॅन्सी कार्स’ चालविण्यावर बंधने आहेत. त्यामुळे काही स्थानी त्यांना अटकाव केला जातो. तथापि, एकंदरीत त्यांच्या या अद्भूत कारची चर्चा ते जातील, तेथे होत राहते.

Advertisement

Advertisement
Tags :

.