For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाहतूक नियमभंग प्रकरणे ए-आय कॅमेऱ्यांमध्ये कैद

12:46 PM Jul 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
वाहतूक नियमभंग प्रकरणे ए आय कॅमेऱ्यांमध्ये कैद
Advertisement

24 तासांत 23 हजारपेक्षा अधिक नियमभंग प्रकरणांची नोंद

Advertisement

पणजी : 15 जुलैपासून सुरू झालेल्या ए-आय कॅमेऱ्यांच्या निरीक्षणातून एका दिवसांत म्हणजे गेल्या 24 तासांत 23,000 पेक्षा अधिक नियमभंग झाल्याची प्रकरणे नोंदवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. राज्यभरात एकूण 26 ठिकाणी बसवण्यात आलेल्या ए-आय कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही प्रकरणे कैद झाली आहेत. त्यामुळे गोव्यातील वाहनचालक मोठ्या संख्येने वाहतूक नियमांचा भंग करतात, ही गोष्ट त्यातून समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून-दिवसांपासून ए-आय कॅमेऱ्यांची कार्यवाही सुरू करणार म्हणून सांगण्यात आले होते.

त्याची जनजागृती व्हावी म्हणून वृत्तपत्रात दंडात्मक रकमेसह जाहिराती देण्यात आल्या होत्या. दंडाची रक्कम मोठी असणार, असेही वारंवार बजावण्यात आले होते तरीही नियमभंग मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. मागे प्रायोगिक तत्त्वावर ए-आय कॅमेरा सुरू झाले तेव्हा तर  एका दिवसातून 50 हजारापेक्षा अधिक नियमभंगाची नोंद झाली होती. दरदिवशी जर अशाप्रकारे हजारोंच्या संख्येने वाहतूक नियमांचा भंग होत राहिला आणि ती प्रकरणे कॅमेरात नोंद झाली तर त्यांचे काय करायचे, सर्वांना चलने द्यायची की नाही ? का निवडक भंगालाच चलन द्यायचे हा मोठा वाहतूक पोलिसांसमोर यक्षप्रश्न आहे. त्यामुळे सध्या तरी मर्यादित संख्येने चलने देण्याचे धोरण आखण्यात आले असून नंतर हळूहळू चलने वाढवण्याचे ठरवण्यात आले आहे.

Advertisement

केवळ 17 जणांनाच पाठविली चलने

मोठ्या संख्येने नियमांचा भंग झाला असला तरी फक्त 17 जणांनाच चलने पाठवण्यात आली असून इतरांना चलने द्यायची की नाही, यावर विचार चालू आहे. हेल्मेट घातले नाही म्हणून 16 वाहनचालकांना चलने देण्यात आली असून सीटबेल्ट घातला नसल्याने एका वाहनचालकास चलन मिळाले आहे. इतरांना चलने देण्यात आलेली नाहीत. विमा नसणे, मोबाईलवर बोलणे, अनधिकृत पार्किंग या कारणासाठी इतर प्रकरणांची नोंद झाली आहे.

Advertisement
Tags :

.