Sangli Crime| विट्यात नशेखोरांची भांडणे सोडवणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण; दोघे ताब्यात
विटा: नशेखोरांची भांडणेसोडविण्यास गेलेल्या वाहतूक पोलिस विक्रमसिंह गायकवाड यांना मारहाण झाल्याचा प्रकार आज सायंकाळी सहाच्या सुमारास विटा शहरातील विटा - तासगांव रस्त्यावर घडला. याबाबत दोन नशेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बिटा-तासगांव रस्त्यावर आजसायंकाळी सहाच्या सुमारास तीन नशेखोर तरूणांची भांडणे सुरू होती. भांडणे सुरू असताना भांडणे पहाण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी गेले. वाहतूक पोलिस विक्रमसिंह गायकवाड नशेखोरांना भांडणापासून प्रवृत्त करत असताना गायकवाड यांना नशेखोरांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. दरम्यान, रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नशेखोरांची भांडणे सुरू असताना बघ्यांची गर्दी झाली होती. मात्र कोणीही भांडणे सोडवण्यासाठी पुढे जाण्यास तयार नव्हते. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा असणाऱ्या बाहतूक पोलीस विक्रमसिंह गायकवाड यांना तासगाव रस्त्यावर गर्दी झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी नशेखोरांकडून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची चर्चा होती. बध्यांची गर्दी मात्र मोबाईलवर चित्रीकरण करण्यात व्यस्त होती.