पांगुळ गल्लीत वाहतूक पोलिसांकडून कारवाई
व्यापाऱ्यांना सूचना करण्यासह दुकानाबाहेर लावलेले फलक जप्त
बेळगाव : शहरातील व्यापारी आणि वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी मुख्य बाजारपेठेतील पांगुळ गल्लीत अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांना सूचना करत दुकानाबाहेर लावण्यात आलेले जाहिरात फलक पोलिसांनी जप्त केले. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून शहरासह बाजारपेठेने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा झाले आहेत. त्याचबरोबर मुख्य बाजारपेठ असलेल्या गणपत गल्ली, मारुती गल्ली, पांगुळ गल्ली, रविवार पेठ, काकतीवेस, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, रामलिंगखिंड गल्ली आदी ठिकाणी वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहने पार्क करत आहेत.
तसेच व्यापाऱ्यांकडून अतिक्रमण करण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले आहे. त्याचबरोबर व्यापाऱ्यांनी जाहिरातींचे फलक रस्त्यावर लावल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम होत होता. बैठे व्यापारी आणि फेरीवाले मनमानी पद्धतीने बाजारपेठेत व्यापार करीत होते. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त जोतिबा निकम यांनी पुढाकार घेत वाहतूक दक्षिण आणि उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पांगुळ गल्लीतील व्यापाऱ्यांना सूचना करण्यासह दुकानाबाहेर लावण्यात आलेले फलक पोलिसांनी जप्त केले.