दोडामार्गात नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई
दोडामार्ग - वार्ताहर
दोडामार्ग बाजारपेठेत नको त्या ठिकाणी वाहने पार्क करून वाहतूक कोंडी करणाऱ्यांच्या विरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. रविवारच्या आठवडा बाजारदिनी झालेल्या कारवाईत पोलिसांकडून ११ हजार ५०० रुपयांचा दंड वाहनचालकांना करण्यात आला. दरम्यान कर्णकर्कश आवाजाच्या सायलेन्सरने हैराण करणाऱ्या दुचाकीस्वारावरही कडक कारवाई केली. या अशा दुचाकी स्वारांवर दोडामार्ग पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
येथील बाजारपेठेत चारही प्रमुख राज्यामार्गालगत दुचाकी व चारचाकी वाहने पार्क करून ठेवण्याचे प्रकार अलीकडेच वाढीस लागले आहेत. अशा या बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी दररोज उद्भवत असते. अनेकदा रुग्णवाहिका देखील या अशा वाहनचालकांमूळे अडकून पडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे दोडामार्ग पोलिसांनी अशा पद्धतीने वाहने पार्क करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी व्यापारी नागरिक यांच्याकडून होत होती. रविवारी आठवडा बाजार दिनी येथील पिंपळेश्वर चौकात तैनात असलेल्या वाहतूक पोलीस रामचंद्र साटेलकर यांनी कारवाईचा बडगा उगारला. बेशिस्त वाहने पार्क करणाऱ्यांसोबत ट्रिपल सीट, अल्पवयीन मुले मुली, काळया रंगाच्या काचेची वाहने, कर्णकर्षक सायलेन्सर असलेल्या दुचाकीवर कारवाई करत ११ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. ही कारवाई पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून ती आता कायम राहणार आहे असेही पोलीस सूत्रांनी सांगितले.
फोटो -
दोडामार्ग - काळया काचेच्या वाहनांवर कारवाई करताना वाहतूक पोलीस रामचंद्र साटेलकर.
छाया - समीर ठाकूर