कर्कश सायलेन्सर...फिरला बुलडोझर
वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूच राहणार
बेळगाव : कर्कश आवाजाच्या सायलेन्सरविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. एकूण 157 मोटारसायकलस्वारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, यापैकी 147 सायलेन्सर नष्ट करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वाहतूक पोलिसांनी गुरुवारी सायलेन्सरवर बुलडोझर फिरवून ती नष्ट केली आहेत. ही कारवाई सुरूच राहणार आहे. शहर व उपनगरात रस्त्याशेजारी उभी करण्यात आलेल्या जुन्या वाहनांविषयी माहिती देण्याचे आवाहन आपण बेळगावकरांना केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एकूण 20 वाहने पोलिसांनी हलवल्याचे आयुक्तांनी सांगितले.
कर्कश आवाजाचे सायलेन्सर आढळल्यास कारवाई
वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच कर्कश आवाजाच्या सायलेन्सरवर कारवाई केली जात आहे. रस्त्यावर वाहने अडवून तपासणी करण्याऐवजी मेकॅनिकना सोबत घेऊनच पोलीस या कारवाईत गुंतले आहेत. पार्किंगच्या ठिकाणी पाहणी करून कर्कश आवाजाचे सायलेन्सर आढळले तर कारवाई केली जात आहे. नागरिकांनी रस्त्याशेजारी उभी करण्यात आलेल्या जुन्या वाहनांविषयीही माहिती देण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.