कुडाळात डंपर वाहतुकीवर कारवाई
कुडाळ
कुडाळच्या आठवडा बाजारा दिवशी बुधवारी कुडाळ मुख्य रस्त्यावरून डंपर वाहतूक करणाऱ्यांना कुडाळ पोलिसांनी दणका दिला. कुडाळ पोलीस ठाण्यासमोरच वाहतूक पोलीस ज्योती रायशिरोडकर यांनी वाहतूक करणारे डंपर अडवून सदर कारवाई केली.वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आठवडा बाजारा दिवशी या मार्गाने डंपर वाहतूक बंद करावी.अशी सूचना करूनही वाहतूक सुरूच ठेवल्याने भारतीय दंड संहिता कलम २८५ व २८१ अन्वये ही कारवाई करण्यात आली.कुडाळ शहरातून डंपर वाहतूक राजरोस सुरु असते. वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. वाळू वाहतूक परवाना असलेली डंपर वाहतूक दिवसा सुरू असते,तर वाळू वाहतूक परवाना नसलेली वाहतूक सायंकाळ पासून सुरू असते. सदर वाहतूक वेगात असते. अपघाताच्या अनेक घटना घडतात.शहरातील वाहने व पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. डंपर वाहतुकीमुळे ही समस्या अधिक वाढणार असल्याने बुधवारी आठवडा बाजारादिवशी मालवण ( नेरूर ,कुडाळ नाबरवाडी मार्गे ) मार्गाने कुडाळ पोस्ट कार्यालय येथून मुख्य रस्त्यावरून होणारी वाहतूक बंद ठेवावी,अशी मागणी नागरिक व सामाजिक संस्थानी केली होती. पोलिसांनी तशा सूचना डंपर चालक मालक संघटनेला दिल्या होत्या.मात्र,डंपर व्यावसायिकांनी सूचना धाब्यावर बसवून आठवडा बाजारादिवशी डंपर वाहतूक सुरूच ठेवली. गेले दोन - तीन आठवडा बाजारादिवशी डंपर व अन्य अवजड वाहनावर कुडाळ वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.आजही डंपर आणि अवजड वाहतूक बंद करण्याची कारवाई कुडाळ पोलिसांनी केली. कुडाळ पोलीस ठाण्यासमोर वाहतूक पोलीस ज्योती रायशिरोडकर यांनी मुख्य मार्गावरून जाणारे डंपर थांबवून ते पोलीस ठाण्यात वळविण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिक व अन्य वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले. या कारवाईत सातत्य राहिले पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.