सेफ स्ट्रीटवरच वाहतुकीला अडथळा
विटा :
येथील विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर दगडी पाण्याच्या टाकीनजीक असलेल्या नगरबाचनालयासमोर दुचाकी पार्किंगचा वाहतुकीला अडथळा होत आहे. परिणामी वाहतूक कोंडीला वाहनधारक व नागरीकांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. याठिकाणी दोन चारचाकी वाहने पास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथे पालिका प्रशासनाने सम, विषम पार्किंग करून वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने हा मार्ग सेफ स्ट्रीट म्हणून जाहीर केला आहे.
शहरात पार्किंगची समस्या मोठी आहे. येथे कराड रस्त्यावर नगरवाचनालय ते क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यापर्यंत सायंकाळी साडेपाचनंतर मोठ्या प्रमाणात बाहतूक कोंडी होते. येथे रस्ता अरूंद आहे. त्यातच या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी पार्किंगचे पांढरे पट्टे ओढले आहेत.
तेथे दुचाकी पार्किंग केल्या जात आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी पार्किंग केल्याने रस्ता अरूंद होत आहे. त्यामुळे याठिकाणी चारचाकी वाहने चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
गांधी चौकात दगडी पाण्याची टाकी आहे. उभ्या पेठेतून होणारी वाहतूक आणि पॉवर हाऊस रोडवरील वाहतूक याचा ताण येथिल वाहतुकीवर होत आहे. दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यावर हमखास वाहतूक कोंडी होते आणि त्यातून बादावादीचे प्रकार घडत आहेत. या परिसरात कपडे, भाजीपाला यासह अन्य वस्तू व साहित्य खरेदी करण्यासाठी महिला, पुरूषांची तसेच शाळकरी मुलांची गर्दी असते. नागरीकांना रस्त्यावरून चालतानाही वाहनांचा अडथळा होत आहे. शिवाय नगरवाचनालयाच्या बाजूला उत्तर बाजूला रिक्षा थांबा तर दक्षिण बाजूला रस्त्यावरच पार्किंग पट्ट्यात भाजी विक्रेते भाजी विक्री करण्यासाठी बसत असतात. त्यामुळे या चौकात मोठी गर्दी होऊन वाहतूक ठप्प होते.
याठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे दुचाकी पार्किंग सम, विषम केल्यास एका बाजूचा रस्ता खुला होऊन बाहतूकीला अडथळा होणार नाही. चारचाकी वाहने सहज पास होतील आणि वादावादीचे प्रसंग टाळले जातील. यासाठी पालिका प्रशासनाने नगरवाचनालय ते क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यापर्यंत सम, विषम पार्किंग करावे अशी मागणी होत आहे.
विशेष म्हणजे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विटा हायस्कूल हा रस्ता सेफ स्ट्रीट म्हणून घोषित केला आहे. त्याचे उद्घाटन आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीच्या टप्यात या रस्त्यावर सातत्याने बाहतूक पोलिसांची गस्त होती. मात्र दिवस निघून गेले तशी ही गस्त थंड पडली. याच दरम्यान असणारे वाहनतळ बेशिस्त पार्किंगचा अड्डा बनले आहे. शाळा महाविद्यालये आणि शासकीय कार्यालय सुटल्यानंतर या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते आणि नेमकी त्याच वेळी वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर ठोस उपाय करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.