For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाहतूक कोंडीचा फेरा...

06:11 AM Mar 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
वाहतूक कोंडीचा फेरा
Advertisement

भारतामध्ये मागच्या दोन ते तीन दशकांमध्ये नागरीकरणाचा वेग प्रचंड वाढला आहे. शहरांमध्ये रोजगार, उद्योग आणि शिक्षणाच्या संधी वाढल्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढली असून, त्या जोडीला वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी देशातील अनेक महानगरांमध्ये वाहतूक कोंडी ही जटील समस्या होऊन बसली आहे. या वाहतूक कोंडीमुळे वेळेचा अपव्यय होत असून, पर्यावरणाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. इंधनाचा अपव्यय, वाढते वायूप्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे होणारे परिणाम यातून समस्यांची यादी लांबतच चालल्याचे दिसते. हे पाहता कोंडी आणि कोंडमारा हे शहरे आणि महामार्गांपुढचे मोठे आव्हान म्हणावे लागेल.

Advertisement

देशातील गजबजलेला मार्ग म्हणून पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग, बेंगळूर-म्हैसूर महामार्ग, दिल्ली-गुडगाव एक्स्प्रेस हायवे यांसह विविध मार्गाचा समावेश होतो. द्रुतगती या शब्दाचा अर्थ वेगवान वा विनाअडथळा प्रवास असा होतो. किंबहुना, बहुतांश महामार्गांवरील वाहतुकीचा ताण वाढल्याचे दिसून येते. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वारंवार होणारे अपघात, गॅस टँकर गळती व त्यामुळे वाहतूक कोंडीत पडणारी भर, आणि पर्यायाने सुरक्षेचा निर्माण होणारा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. महामार्गावरून दररोज दहा हजाराहून अधिक वाहने ये-जा करतात. शनिवार, रविवार व सुट्ट्यांच्या हंगामात ही आणखी वाढते. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. तासन्तास वाहने व वाहन चालक अडकून पडतात. एवढ्या महत्त्वाच्या मार्गावर वाहतूक कोंडीचे योग्य व्यवस्थापन व्हायला हवे. तसेच ज्वलनशील किंवा धोकादायक पदार्थांची, वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांची प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काळजी घ्यायला हवी. पण, त्याबाबत हयगय होत असल्याचे मागच्या काही उदाहरणांवरून लक्षात येते. अलीकडे गॅस टँकरच्या झालेल्या दोन अपघातांतून हेच अधोरेखित होते. मुळात हा भाग घाट क्षेत्रामध्ये येतो. महामार्गावर अनेक ठिकाणी उंच पूल व बोगदे आहेत. आजपर्यंत या ठिकाणी सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही. पण, अशी घटना घडल्यास हा मार्ग काही कालावधीसाठी बंद राहू शकतो. याकरिता महाराष्ट्र शासनाने तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबी या सर्वच यंत्रणांनी यावर योग्य ते धोरण ठरवणे गरजेचे बनले आहे. शासनाकडून अवजड वाहने व ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी एक नियमावली तयार करण्यात यावी तसेच द्रुतगती महामार्ग सुरू होण्याच्या प्रवेशद्वारावरच अशा वाहनांची तपासणी आरटीओच्या माध्यमातून करावी, अशी मागणी प्रवासी व इतर लहान वाहनांच्या चालकांकडून करण्यात येत आहे.

बदलत्या काळात नवे पर्याय

Advertisement

मुंबई ते बेंगळूर नवीन महामार्ग उभारण्याचीही शासनाची योजना आहे. हा महामार्ग जेएनपीटी जवळून सुरू होऊन पुण्यातून जाणार आहे. या मार्गामुळे द्रुतगती महामार्गावरील ताण हलका होऊ शकतो. 50 टक्के वाहतूक कमी होऊ शकेल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात प्रेझेंटेशनदरम्यान बोलताना व्यक्त केला. द्रुतगतीवरील कोंडीचा विषय आजचा नाही. पण, त्याला पर्याय लवकरात लवकर उभा राहणे गरजेचे असेल. गडकरी म्हणतात, त्याप्रमाणे झाले, तरच द्रुतगतीची वेगवान प्रवासाची ओळख कायम राहू शकते.

कोकणवासीयांची व्यथा

जी अवस्था द्रुतगतीची तीच मुंबई-गोवा महामार्गाची. गणपती, होळीच्या सणासाठी कोकणात मुंबईतून मोठ्या प्रमाणात चाकरमानी रवाना होतात. पर्यटन हंगामातही रस्त्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे या मार्गावरही अनेकदा अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते. यंदाची होळी हे ताजे उदाहरण. मागच्या शुक्रवार, शनिवार आणि रविवारी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणाकडे निघाले. त्यामुळे यादरम्यान महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. बरेचशे मार्गावर काही ठिकाणी अजून ही रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कोंडीत भर पडली, प्रवाशांचे हाल झाले. काही ठिकाणी चार ते पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या.

मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर शहरात सातत्याने ट्रॅफिक जाम होते. माणगाव बाजारपेठेत पुण्याकडे व मुंबईकडे जाणारी वाहने एकाचवेळी गर्दी करतात. त्यातून येथील वाहतूक व्यवस्था कोलमडते. माणगाव बाजारपेठ ते पुढे लोणेर फाट्यापर्यंत रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे इथ वाहनांच्या लांबच लांब रांगा हा नित्याचा विषय झाला असून, हा टप्पा वाहनचालक, प्रवाशांसाठी डोकेदुखी होऊन बसला आहे. इंदापूर-कोलाड या ठिकाणीही महामार्गाचे काम अजूनही रखडलेले आहे. त्याचा फटकाही वाहतुकीला बसतो.

मुंबई गोवा महामार्गाचे काम मागच्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी अनेक अडचणींमुळे विलंब झाल्याचे सांगत याबाबत खंतही व्यक्त केली आहे. मार्गाचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. आपण या मार्गावरून प्रवास करून त्याचेही परीक्षण करणार आहोत. कामाला उशीर झाला, याबाबत संकोच वाटतो. म्हणूनच आपण याचे उद्घाटन वगैरे करणार नाही. पण लवकरच महामार्ग सुरू होईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने महामार्ग सुरू होऊन वाहतूक कोंडीच्या जाचातून प्रवाशांची मुक्तता होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

कोंडीची कारणे...

जी परिस्थिती या दोन मार्गांची आहे, ती देशातल्या बहुतांश मार्गाची आहे. बेंगळूर हे तर सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर मानले जाते. पुण्यातही हीच परिस्थिती आहे. शहरांची अनियंत्रित वाढ, नागरीकरण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव, खासगी वाहनांची वाढती संख्या, रस्त्यांचे अपुरे जाळे, मोठ्या प्रमाणातील बांधकामे आणि दुऊस्ती कामे, अपघात ही वाहतूक कोंडीची काही प्रमुख कारणे आहेत. खरे तर पूर्वी ही वाहतूक कोंडी केवळ महानगरे वा मोठ्या शहरांपुरती मर्यादित होती; मात्र आता अनेक राष्ट्रीय महामार्गांवरही ती दिसून येते. सुट्टीच्या दिवशी किंवा पर्यटन हंगामात अनेक किमी लांबीच्या वाहनांच्या रांगा छोट्या शहरात वा ग्रामीण पट्ट्यातही पहायला मिळतात.

वाहतूक कोंडी आणि वायूप्रदूषण

वाहतूक कोंडीचा सर्वात गंभीर परिणाम म्हणजे वाढते वायूप्रदूषण. वाहनांची इंजिने चालू ठेऊन वाहने तासन्तास रस्त्यावर उभी राहिल्यामुळे कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि सूक्ष्म कण मोठ्या प्रमाणात हवेत सोडले जातात. यामुळे शहरांमध्ये धूर, धुके आणि स्मॉगची समस्या वाढते.

कोंडीतून आरोग्याचा कोंडमारा

अनेक शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक अनेकदा धोकादायक पातळीवर पोहोचतात. या प्रदूषणामुळे दमा, श्वसनाचे विकार, हृदयरोग आणि इतर आरोग्य समस्या वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ञ सांगतात. हिवाळा व उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढते. त्यातून आरोग्याच्या समस्य उद्भवतात. आरोग्याचा हा कोंडमारा थांबवण्यासाठी कोंडीवर आपल्या उपाय योजावे लागतील.

कोंडीचे आर्थिक परिणाम

वाहतूक कोंडीचे परिणाम वाहतूक कोंडीमुळे अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसतो. इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो, कामावर पोहोचण्यासाठी लागणारा वेळ वाढतो, उद्योग आणि मालवाहतुकीवर परिणाम होतो, काही अहवालांनुसार भारतात ट्रॅफिक जाममुळे दरवषी हजारो कोटी ऊपयांचे आर्थिक नुकसान होते.

उपाययोजना आणि पुढील दिशा

वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना आवश्यक आहेत.

► मुख्य म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार केला पाहिजे.

► मेट्रो, बस, लोकल रेल्वेसेवा सक्षम केल्या पाहिजेत.

► प्रदुषणाची समस्या टाळण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवला पाहिजे.

► शहरांचे नियोजन आणि रस्त्यांचे आधुनिकीकरण, स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापन प्रणाली प्रत्यक्षात आणली पाहिजे.

► दीर्घकालीन धोरण व सुरक्षा उपाय योजनांबाबत ढिलाई होता कामा नये.

सध्याचा सणासुदीचा काळ व त्यानंतरचा सुटीचा तसेच पर्यटनाचा हंगाम लक्षात घेता अधिक काळजीची गरज आहे. त्यादृष्टीने प्रशासन ठोस पावले उचलणार का, कडक नियम करणार का, हे पहावे लागेल.

भविष्याचा विचार करून ‘मार्ग’ काढावाच लागेल!

वाहतूक कोंडी ही केवळ प्रवासातील अडचण नाही. पर्यावरण, आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी गंभीर समस्या आहे. शहरांची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता शाश्वत वाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी करणे ही काळाची आहे. सरकार, प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्रित प्रयत्न केल्यासच वाहतूक कोंडी आणि वाढते प्रदूषण यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल. सध्या अनेक शहरांमध्ये मेट्रोची कामे सुरू आहेत. परंतु, मेट्रोचे जाळे विस्तारले पाहिजे. याशिवाय शहर बस वाहतूक, लोकल सेवाही स्वस्त आणि सक्षम केली, तर त्याचे रिझल्ट चांगले मिळू शकतात. आगामी काळात आव्हाने वाढतच जातील. हे पाहता भविष्याचा विचार करून आत्ताच यावर मार्ग काढणे, हे शहाणपणाचे आणि व्यवहार्य ठरेल.

संकलन : पुणे - प्रतिनिधी

Advertisement
Tags :

.