दुसरे रेल्वेगेट येथे वाहतूक कोंडी
कायमस्वरुपी रहदारी पोलिसांची नेमणुकीची मागणी
बेळगाव : टिळकवाडी येथील दुसरे रेल्वेगेट येथील वाहतूक समस्या काही केल्या दूर होताना दिसत नाही. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास तब्बल अर्धातास वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे नोकरदार तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता आले नाही. त्यामुळे सकाळी लवकर या ठिकाणी रहदारी पोलिसांची सोय करावी, अशी मागणी होत आहे. पहिले रेल्वेगेट येथे बॅरिकेड्स असल्यामुळे दुसरे रेल्वेगेटला वाहनचालकांची गर्दी असते. रस्त्याच्या एका बाजूने जाण्यासाठी वाहनचालकांची धडपड सुरू असतानाच रेल्वेगेट पडल्यास पुढील अर्धातास तरी वाहतूक कोंडी दूर होत नाही. यामुळेच याठिकाणी उड्डाणपुलाचे आरेखन करण्यात आले असून लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. सकाळी 8 ते 10 यावेळेत हुबळी व मिरज या दोन्ही बाजूंनी रेल्वेची ये-जा सुरू असते. त्यातच अनेक एक्स्प्रेस बेळगावकडे येत असल्यामुळे रेल्वेगेट बंद करावे लागतात. सकाळी शाळा, नोकरदारांचे कार्यालय, उद्यमबाग येथील कारखान्यात जाण्यासाठी एकच वेळ असल्याने काँग्रेस रोडवर प्रचंड गर्दी होते. शुक्रवारी सकाळीही अशीच गर्दी झाली होती. रहदारी पोलीस वेळेत न पोहोचल्यामुळे बराच काळ वाहतूक कोंडी होती. त्यामुळे कायमस्वरुपी रहदारी पोलिसांची नेमणुकीची मागणी होत आहे.