वेंगुर्ले -तुळसमार्गे बंद असलेली वाहतूक पूर्ववत
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले तुळसमार्गे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कॅम्प आनंदवाडी नजीकच्या मोरी बांधकामाच्या कामामुळे बंद ठेवण्यात आलेला रस्ता काम पूर्ण झाल्याने सर्व वाहनांच्या वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. याबाबत वेगुर्ले नगरपरीषदेने वेंगुर्लेच्या राज्य परिवहन महामंडळाच्या आगार व्यवस्थापकांना मंगळवारी लेखी पत्राने कळविले असून बुधवार पासून पुर्वी प्रमाणे तुळसमार्गे एसटी. बस गाड्यांची वाहतुक नियमीतपणे सुरू करण्यात आलेली असल्याची माहिती सर्व एस.टी चालक व वाहकांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे या मार्गावरून आता सर्व प्रकारची चारचाकींसह मोठी वाहने प्रवास करू शकणार आहेत. सदरचा रस्ता वाहतुकीस खुला केल्याने पर्यायी वेंगुर्ले बजारपेठेतून केलेल्या सर्व वाहनांच्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.वेंगुर्ले नगरपरिषद हददीतील बॅ. नाथ पै रोडवरील जीवन शिरसाट यांच्या घराजवळील मोरीचे व संरक्षण कठड्याच्या बांधकामाच्या अनुषंगाने या भागातून वाहनांना वाहतूक बंद केलेली होती. पर्यायी मार्ग म्हणून बाजारपेठमार्गे होत होती. नगरपरिषदेने सदर रस्त्यावरील काँक्रिटीकरणाचे काम करण्याकरीता दि २ मे ते दि. १२ मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सदर रस्ता बंद केलेला होता. सदर काम बहुतांशी पुर्ण करण्यात आल्याने मुख्यत्वे मोरीचे काँक्रीटीकरणाचे काम पुर्ण करण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर बंद केलेला रस्ता सर्व वाहनांसाठी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे.