Satara : पाचगणी शहरातील वाहतूक कोलमडली; ट्रक बंद पडल्याने पर्यटकांना अडचण
पर्यटक सिझनमध्ये पाचगणी शहरात वाहतुकीची संकुचित स्थिती
भिलार : पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणी शहरात रविवारी वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा झाला. मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अंतर्गत रस्त्यावर वळवण्यात आलेल्या मार्गावर अचानक एक ट्रक बंद पडल्याने संपूर्ण शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली.
पाचगणी येथील मुख्य रस्त्यावर दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे वाहतूक तात्पुरती अंतर्गत रस्त्यांवर वळवण्यात आली आहे. मात्र, आज रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होती. ही गर्दी शहरातून परतीच्या वाटेवर असतानाच, अरुंद अंतर्गत रस्त्यावर एक मालवाहू ट्रक अचानक बंद पडला. त्यामुळे वाहतूक वळवण्यात आलेले सर्व चौक वाहनांनी तुडुंब भरले होते. परिणामी, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मोठी गैरसोय झाली. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, पोलीस प्रशासनाला वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागले. बंद पडलेला ट्रक बाजूला करणे आणि कोंडी सोडवणे यासाठी पोलिसांची मोठी कसरत सुरू होती. जवळजवळ दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलीसांनी वाहतूक पूर्वपदावर आणली. याशिवाय, शहरातील मुख्य रस्त्याचे खोदकाम सुरू असल्याने कचबावडी नाका, पारशी पॉईंट, बेबी पॉईंट चौकाचा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे.
पर्यटनाच्या सिझनमध्ये रस्ते खोदल्यामुळे वाहतुकीची कोंडी वारंवार होत आहे. यामुळे पर्यटकांना आणि दैनंदिन व्यवहारासाठी बाहेर पडण्प्रया स्थानिक नागरिकांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे.