For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनुस्कुरा घाटात दरड कोसळून वाहतूक दोन तास ठप्प

06:51 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
अनुस्कुरा घाटात दरड कोसळून वाहतूक दोन तास ठप्प
Advertisement

स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी सुरु केली एकेरी वाहतूक

Advertisement

प्रतिनिधी/ राजापूर

तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या पावसात ओणी-पाचल-अनुस्कुरा मार्गावर अनुस्कुरा घाटात मध्यरात्री दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, राजापूर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरील काही दगड बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू केली. तर सकाळी बांधकाम विभागाने रस्त्यावरील दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

Advertisement

राजापूर तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अनुस्कुरा घाटात दरड कोसळण्याची घटना घडली. माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव हे तात्काळ आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी अमर मोरे, रामदास पाटील, स्वप्निल घाटगे, अर्शद मुल्ला आणि जाधव यांनी मदतकार्य सुरू केले. यावेळी घाटातून प्रवास करणारे नागरिक तसेच पाचल येथील बुधवारच्या आठवडा बाजारासाठी भाजीपाला घेऊन निघालेल्या भाजी विक्रेत्यांनीही पोलिसांसोबत खांद्याला खांदा लावून दरड हटविण्याच्या कामात सहभाग घेतला.

बुधवारी सकाळी पूर्ण रस्ता मोकळा

सलग जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरील मोठे दगड व माती बाजूला करण्यात आली. त्यानंतर घाटात एकेरी वाहतूक सुरू करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला असून प्रवाशांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. मात्र एक मोठा दगड रस्त्यावर असल्याने वाहतूक पूर्णपणे सुरळीत करणे शक्य नव्हते. याबाबत बांधकाम विभागाला कळविण्यात आले. बांधकाम विभागाकडून बुधवारी सकाळी जेसीबीसह अन्य साहित्य व कर्मचारी पाठवून रस्त्यावर कोसळलेले दगड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळी अनुस्कुरा घाटरस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.

सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्त

अनुस्कुरा घाटात दरड कोसळून दगड व माती रस्त्यावर आल्याने पोलिसांनी या परिसरात सुरक्षिततेच्या कारणास्तव बंदोबस्त ठेवला आहे. घाटात पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घाट परिसरातील धोकादायक उतारांची नियमित तपासणी, रस्त्यालगत वाढलेली झाडे व झुडपे हटविणे, तुंबलेली गटारे साफ करून पाण्याचा निचरा सुरळीत ठेवणे तसेच संभाव्य दरडप्रवण ठिकाणी संरक्षणात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत वाहनचालक व ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.