चौथ्या रेल्वेगेटवरील कामामुळे वाहतुकीत व्यत्यय
बेळगाव : अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट परिसरात रेल्वेमार्गाची दुरुस्ती केली जात असल्याने रविवारी सकाळपासून रेल्वेगेट बंद ठेवण्यात आला होता. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला. रेल्वेगेटच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वेगेटला वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. नैर्त्रुत्य रेल्वेने पूर्वसूचना दिल्याप्रमाणे रविवारी सकाळी रेल्वेगेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. रेल्वेरूळाच्या बाजूचे पेव्हर्स हटवून त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम करण्यात आले. अनगोळ सोबतच येळ्ळूर, सुळगा येथून उद्यमबाग येथे जाणाऱ्या प्रवाशांना एकतर मजगाव शिवारातील पाचवे रेल्वेगेट अथवा टिळकवाडीतील तिसऱ्या रेल्वेगेटचा आधार घ्यावा लागला. काही वाहनचालकांना रेल्वेगेट बंद असल्याची कल्पना नसल्याने त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दिवसभर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम सुरू ठेवण्यात आले होते. दुपारपर्यंत हे काम सुरू असल्याने रेल्वेगेट बंद ठेवण्यात आले होते. दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेगेट खुला करण्यात आला.