जलवाहिनी दुरुस्ती कामामुळे वाहतूक विस्कळीत
एलअॅण्डटीकडून दुरुस्ती : भरचौकात वाहतुकीची कोंडी, कमी दर्जाच्या जलवाहिन्यांमुळे सातत्याने दुरुस्ती
बेळगाव : शहर परिसरात मुख्य रस्त्यावर जलवाहिन्यांना गळती लागत असल्याने याचा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ लागला आहे. जलवाहिनींच्या दुरुस्तीमुळे वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊन कोंडी होऊ लागली आहे. गोवावेस बसवेश्वर सर्कल येथे मंगळवारी जलवाहिनीच्या दुरुस्ती कामामुळे भरचौकात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला. शहरात एकीकडे एलअॅण्डटीकडून 24 तास पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे दररोज कुठेना कुठे जलवाहिन्यांना गळती लागू लागली आहे. दरम्यान, गळती दूर करताना शहरातील वाहतूक व्यवस्थेतही अडथळा निर्माण होऊ लागला आहे.
तर काही ठिकाणी पाणी वाया जात असल्याने रस्त्यावर अडथळा निर्माण होऊ लागला आहे. एलअॅण्डटी कंपनीकडून कमी दर्जाच्या जलवाहिन्या घातल्या जात असल्याने सातत्याने दुरुस्तीची कामे हाती घेतली जात आहेत, असा संतापही नागरिकांतून व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी गोगटे सर्कलजवळ जलवाहिनी दुरुस्तीसाठी खोदाई करण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण झाला होता. आता पुन्हा बसवेश्वर सर्कल येथे जलवाहिन्यांना गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र याचा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ लागला आहे.
जलवाहिन्यांच्या दुरुस्ती कामांमुळे वाहतूक व्यवस्था अडचणीत
शहरासह शहराबाहेरील मुख्य रस्त्यांवर जलवाहिनींच्या दुरुस्ती कामांमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ लागली आहे. तातडीने दुरुस्तीचे काम केले जात नसल्याने कित्येक दिवस खोदाई केलेला रस्ता तसाच पडून राहत आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणे त्रासदायक ठरले आहे. अधिक वर्दळीच्या ठिकाणी दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.