आठ दिवसांत सुटणार वाहतूक कोंडी; नव्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सूचना
पणजी : नव्याने सुरू झालेल्या पर्वरी उड्डाणपुलामुळे आणि आसपासच्या भागात निर्माण झालेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर, पुढील आठ दिवसांत सर्व्हिस लेन्सची दुरुस्ती करून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे.
वाहतुकीचा वेग सुकर करण्यासाठी 'अटल सेतू आणि पर्वरी उड्डाणपुलाचे एन्ट्री व एक्झिट पॉईंट्स (प्रवेश आणि निकास मार्ग) सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून खुले केले जातील. स्थानिक पर्वरीवासीयांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, पर्वरीतील नागरिकांना अटल सेतूवर प्रवेश मिळावा, यासाठी स्वतंत्र अंतर्गत मार्ग देण्यास बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आयआयटी खरगपूरचे तज्ज्ञ प्रामुख्याने बैठकीत उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी पर्वरी उड्डाणपूल आणि अटल सेतू जोडणीबाबतच्या तांत्रिक बदलांची अधिकृत माहिती दिली. ते म्हणाले, आयआयटी खरगपूरच्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या शिफारशी आणि आराखड्यानुसार वाहतुकीचे नवे नियोजन अंतिम करण्यात आले आहे.
पर्वरीवासीयांसाठी स्वतंत्र मार्ग; दुचाकींना बंदी
बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले की, मॅजेस्टिकसमोरील सर्व्हिस रोडचा काही भाग बंद केले जातील. या नवीन बदलांमुळे पणजी-म्हापसा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण ६० टक्क्यांहूनअधिक कमी होईल आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल.
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
बांधकाम उपक्रमांमुळे खराब झालेल्या सर्व सर्व्हिस लेन्सची डागडुजी आणि दुरुस्ती आठ दिवसांतपूर्ण करावी, असे सांगण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकल्पावर आणि वाहतूक नियोजनावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आता नियमितपणे आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबरच मुख्यमंत्र्यांनी जनतेला होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करत सहकार्याचे आवाहन केले आहे.
सुरक्षेसाठी ४८ तासांत होणार ह्या उपाययोजना
वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी रंबल स्ट्रिप्स आणि नवीन ट्रॅफिक सिग्नल्स बसवले जाणार आहेत. संपूर्ण उड्डाणपूल परिसरात गती मर्यादा दर्शवणारे डिजिटल फलक आणि ॲडव्हान्स साईनबोर्ड्स लावण्यात येणार आहेत. आयआयटीच्या पथकाने पाहणी केल्यानंतर पुढील ४८ तासांत प्राथमिक सुरक्षेचे काम सुरू होणार असून, दुसऱ्या टप्प्यात मोठे संरचनात्मक बदल केले जातील.
अशी असेल वाहतूक व्यवस्था
अटल सेतूवरून येणाऱ्या वाहनांना उड्डाणपुलापूर्वीच बाहेर पडण्यासाठी मार्ग दिला जाईल, जेणेकरून ही वाहने खालील मुख्य रस्त्याचा वापर करू शकतील.
तसेच अटल सेतूवर चढण्यासाठी नवीन प्रवेश मार्ग खुला केला जाईल.
अपघात टाळण्यासाठी आणि वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी या संपूर्ण पट्ट्यात एकच प्रवेश आणि एकच निकासमार्ग निश्चित करण्यात आला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव नव्या उड्डाणपुलावरून दुचाकी वाहनांच्या प्रवासाला तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.