For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक कोंडीत भर

11:49 AM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक कोंडीत भर
Advertisement

पदपथ कधी अतिक्रमणमुक्त होणार? बाजारपेठेत कारवाईकडे दुर्लक्षच

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेकडून पदपथावरील अतिक्रमण त्याचबरोबर अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची मोहीम तीव्र करण्यात आली असली तरीही अद्याप देखील शहरातील अनेक ठिकाणच्या पदपथांवर अतिक्रमण कायम आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथावरून चालत जाण्याऐवजी जीव मुठीत धरून रस्त्यांवरून चालत जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे याकडे महापालिका कधी गांभीर्याने लक्ष देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

खडेबाजार, गणपत गल्ली, शनिवार खूट, भेंडीबाजार, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, यंदे खूट, किर्लोस्कर रोड, वडगाव, शहापूर, कपिलेश्वर देवस्थान रोड, नेहरुनगर, एपीएमसी मार्केट यार्ड यासह विविध ठिकाणी रस्त्यांवर विक्रेते अनधिकृत स्टॉल्स बांधकाम साहित्याच्या ढिगाऱ्यांनी पदपथ पूर्णपणे व्यापले आहेत. परिणामी पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्यास भाग पाडत आहे. अपघातांसोबत वाहतूक कोंडीही वाढत आहे.

Advertisement

महापालिकेचे अधिकारी मुख्य रस्त्यालगतच्या पदपथावरील दुकाने हटवत आहेत. मात्र, बाजारपेठ परिसरात ही समस्या जैसे थे आहे. तरी देखील त्या ठिकाणी कारवाई करण्याकडे दुर्लक्ष का होत आहे? असा आरोप करण्यात येत आहे. शहरातील बहुतेक दुकानदारांनी त्यांच्या व्यवसायाच्या विस्ताराचा भाग म्हणून रस्त्याच्या मध्यापर्यंत नावाच्या पाट्या लावल्या आहेत. यामुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होत असून काही ठिकाणी 40 फूट रुंद असलेले रस्ते अतिक्रमाणामुळे 10 फुटांपर्यंत आकसले आहेत. अनधिकृत जाहिरात फलक व इतर कारणांमुळे महानगरपालिकेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

Advertisement
Tags :

.