For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरात रविवारी सर्वत्र वाहतूक कोंडी

11:45 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहरात रविवारी सर्वत्र वाहतूक कोंडी
Advertisement

लग्नसराईची धामधूम, पंतप्रधानांची सभा, यात्रा-जत्रांमुळे वाहनांची गर्दी

Advertisement

बेळगाव : रविवारचा दिवस हा वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रस्त करणारा होता. सर्वत्र सुरू असलेले यात्रोत्सव, लग्नसराईची धामधूम आणि त्यात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा यामुळे शहरात जिकडे पहावे तिकडे वाहनांची कोंडीच कोंडी दिसत होती. यामुळे वाहन चालविणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. रविवारी लग्नांचा मुहूर्त असल्याने सर्वत्र लग्नांची धामधूम सुरू होती. शहर तसेच उपनगरांमधील मंगल कार्यालयांमध्ये लग्नसराईची धावपळ सुरू असल्याचे दिसत होते. लग्नसराईचे दिवस असल्याने बेळगावच्या मुख्य बाजारपेठेतही खरेदीसाठी गर्दी होती. केवळ बेळगावच नाही तर चंदगड, गोवा, सावंतवाडी येथूनही नागरिक खरेदीसाठी रविवारी बेळगावात आल्याने प्रचंड गर्दी झाली होती. साप्ताहिक सुटी असल्याने खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक होती.

सध्या बेनकनहळ्ळी, गणेशपूर येथील महालक्ष्मी यात्रा सुरू असल्याने रामघाट रोड, हिंडलगा रोड तसेच सावगाव रोड या तिन्ही रस्त्यांवर वाहनांची कोंडी झाली होती. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुचाकी वाहने बाजूने निघून जात असली तरी चारचाकी वाहने मात्र तासन् तास वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने वाहनांमध्ये बसलेले नागरिक उकाड्याने हैराण झाले. मिलिटरी हॉस्पिटल येथून बेनकनहळ्ळी गावापर्यंत पोहोचण्यास तास ते दीड तास कालावधी लागल्याने नागरिकांनी नाराजीही व्यक्त केली. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अलारवाड क्रॉस येथे जाहीर सभा होती. या सभेसाठी वाहतुकीच्या मार्गात बदल केल्याने ठिकठिकाणी कोंडी झाली. त्यातच रविवारी खासबाग येथील आठवडी बाजार असल्याने शहापूर, भारतनगर, खासबाग, महात्मा फुले रोड या ठिकाणी वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. एकूणच रविवारचा दिवस वाहतूक कोंडीचा ठरला. शहरासह उपनगरात वाहतुकीची कोंडी दिसून आली. वाहने पार्किंग करण्यासाठी बापट गल्ली येथील कार पार्किंग फुल्ल झाल्याने धर्मवीर संभाजी चौक ते उभा मारुती या परिसरात वाहने पार्किंग केली जात होती. यामुळे रात्री उशिरापर्यंत शहरातील वाहतूक कोंडी सुरूच होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.