बोरी पुलाच्या दुरुस्तीकामामुळे वाहतूक कोंडी, नागरिकांचे हाल
कामावर, शाळेत, विविध ठिकाणी पोहोचले उशिरा
मडगाव : बोरी पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे सध्या प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तसेच वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काल मंगळवारी सकाळी बोरी पुलावर काम सुरू असल्याने दोन्ही बाजूनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मंगळवारी सकाळी कोणतीही पूर्व कल्पना न देता बोरी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे वाहनांची कोंडी झाली. हे दुरुस्तीकाम रात्री उशिरा हाती घेणे आवश्यक असताना ते दिवसा हाती घेण्यात आल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या व रात्र पाळीच्या कामानंतर सकाळी घरी परतणाऱ्यांचे बरेच हाल झाले. अनेकांनी बोरी पुलापर्यंत जाऊन पूल ओलांडून वेळीच कामावर जाणे शक्य झाले नसल्याने घरचा रस्ता धरला.
वाहनांच्या रांगा, फेरीबोटी अपुऱ्या
गेले काही दिवस बोरी पुलाच्या जॉईन्टच्या कामाची दुरुस्ती केली जात असून हे काम रात्रीच्यावेळी हाती घेण्यात आले होते. मात्र, काल मंगळवारी सकाळी हे काम सुरू राहिल्याने पुलावरील वाहतूक एकेरी करण्यात आली होती. त्यामुळे वाहनांची कोंडी झाली. पुलाच्या दोन्ही बाजूनी वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यात काही जणांनी राशोल-शिरोडा फेरीबोटीतून तर काहींनी दुर्भाट-रासई फेरीबोटीतून प्रवास करणे पसंत केले. मात्र, या फेरीबोटीतून केवळ चार वाहने नेणे शक्य असल्याने फेरीबोटीवरही ताण आला होता.
पूल शेवटची घटका मोजतोय काय?
बोरी पुलाच्या जॉईन्टची दुरुस्ती केली जात असून खोदकाम करून तुटलेल्या सळ्या वेल्डिंग मारून जोडल्या जात होत्या. पुलावर बऱ्याच ठिकाणी खोदकाम करण्यात आल्याने लोखंडी सळ्याही उघड्या पडल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे हा पूल शेवटची घटका मोजतोय का असा सवालही वाहनचालकांच्या तसेच प्रवाशांच्या मनात उपस्थित होत आहे. काल सकाळी वाहतुकीची कोंडी झाली. त्यानंतर खोदकाम केलेल्या ठिकाणी दुरुस्ती काम हाती घेण्यात आले होते. पुलाच्या दुरुस्तीचे काम रात्री उशिरा हाती घेऊन पहाटेपर्यंत ते पूर्ण करावे, अशी वाहनचालकांकडून मागणी होत आहे. या पुलावरून अवजड वाहने प्रवास करत असल्याने पुलाची परिस्थिती धोकादायक बनली आहे. या पुलावरील अवजड वाहतूक बंद करावी व केवळ हलकी वाहने सोडावीत, अशी मागणी होत आहे. नवीन पुलाचे काम लांबणीवर पडल्याने विद्यमान पुलाची काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे बनले आहे.