खानापूर शहरातील वाहतुकीचा बोजवारा
अस्ताव्यस्त दुचाकी पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा : रस्त्यावर भाजी, फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण : न. पं. चे अक्षम्य दुर्लक्ष
खानापूर : खानापूर शहराच्या मुख्य रस्त्यावर नियोजनाअभावी सतत वाहतुकीची केंडी होत आहे. या समस्येमुळे नागरिक, व्यापारी, वाहतूक करणारे अक्षरश मेटाकुटीला आले आहेत. मात्र या गंभीर समस्येकडे नगरपंचायत तसेच पोलीस आणि प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष झाले असून नागरिकांतून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. नगरपंचायतीने तातडीने संपूर्ण शहरातील वाहतुकीच्या कोंडीची समस्या सोडवावी वाहनांची वाढती वर्दळ त्यातच व्यापाऱ्यांनी केलेले फुटपाथावरील अतिक्रमण तसेच फेरीवाले, भाजी विक्रेते, फळविक्रेते यांचे रस्त्यावरील अतिक्रमण यामुळे स्टेशनरोडवर रहदारीचा वाढता ताण त्यातच अलीकडे भाजी विक्रेत्यांनी चक्क शिवस्मारकापर्यंत आपली दुकाने थाटत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. त्यामुळे स्टेशनरोडवर नेमकी मालकी कुणाची, गाळेधारक व्यापाऱ्यांची, फेरीवाल्यांची, भाजी विक्रेत्यांची की नगरपंचायतीची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पार्किंगमुळे रस्त्याचे अस्तित्वच नष्ट
बाजारपेठ मोठ्या प्रमाणात वाढल्याने आहे. शिवस्मारक चौक ते चव्हाण दुकानापर्यंत असलेल्या गाळेधारकांचे फूटपाथावर झालेले अतिक्रमण तसेच खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या दुचाकी वाहने एका मागोमाग अशी चार-चार वाहने लावण्यात येत असल्याने अगोदरच अरुंद असलेला रस्ता वाहतुकीसाठी त्रासदायक बनत आहे. त्यामुळे राजा छत्रपती स्मारक ते लक्ष्मी मंदिरापर्यंत दुचाकी वाहनांच्या पार्किंगमुळे रस्त्याचे अस्तित्वच नाहीसे झाले आहे. रस्ता शहराचा प्रवेशद्वार असल्याने खानापूर शहरात प्रवेश केल्यापासूनच वाहतुकीचा सामना करावा लागत आहे. गेली काही वर्षे याबाबत सातत्याने नागरिकांतून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र याकडे नगरपंचायत आणि पोलिसानी साफ दुर्लक्ष केले आहे. दोन्ही बाजूने फुटपाथ बांधल्यामुळे रस्ता अरुंद झाल्याने व्यापाऱ्यानी या फुटपाथवर दुकानांचे सामान लावलेले आहे. त्यामुळे फुटपाथच्या बाहेर रस्त्यावर दुचाकी वाहनांचे पार्किंग होत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी कमी पडत आहे.
अतिक्रमणावर नियंत्रण आणा
काहीवेळा नगरपंचायतीकडून जुजबी कारवाई करण्यात येते. खानापूर महालक्ष्मी यात्रेनिमित्ताने फूटपाथरील अतिक्रमनेही हटविण्यात आली. भाजी आणि फळ विक्रेत्याना चव्हाण दूकानांच्या बाजूकडील रस्त्यावर हेस्कॉमच्या कंपाऊंडला लागून भाजी विक्रेत्यासाठी गाळेही बांधण्यात आले व त्याना कब्जा देण्यात आला. भाजी विक्रेते त्या गाळ्यांचा वापर न करता स्टेशनरोडवर आपला व्यवसाय करत आहेत. काही फळ विक्रेतेही चव्हाण दुकानाच्या बाजूकडील रस्त्यावर बसत आहेत. त्यामुळे हा ही रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. यापूर्वी सदर भाजी विक्रेत्यानी स्टेशनरोडवरील गाळ्यांच्या समोर दुकाने थाटली नव्हती. पण नगरपंचायतीच्या दुर्लक्षपणाचा फायदा उठवत भाजी विक्रेत्यानी आता आपली दुकाने शिवस्मारकापर्यंत थाटण्यास सुरुवात केल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.
परिणामी वाहने अस्ताव्यस्त लावण्यात येत असल्याने स्टेशनरोडवर अनेकवेळा चक्काजाम होत आहे. नगरप्रशासनाने याची दखल घेऊन अतिक्रमणावर नियंत्रण आणावे, अशी मागणी व्यापारी तसेच नागरिकांतून होत आहे. मिनी विधानसौध बांधल्यानंतर तहसीलदार कार्यालयदेखील स्टेशनरोडवरच आल्याने तहसीलदार कार्यालय, पोस्ट, नगरपंचायत, शासकीय इस्पितळ, रेल्वेस्टेशन तसेच सर्व बँका, बेळगाव-गोवा रस्त्यावर आल्याने तसेच शाळा, महाविद्यालये यामुळे राजा छत्रपती चौक ते ज्ञानेश्वर मंदिरपर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड वर्दळ होत आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत ट्रक, टेंपो यासारख्या मालवाहू वाहनांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. अनेकवेळा चारचाकी वाहनांच्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. सध्या नगरसेवकांच्या हाती शहराचा कारभार आला आहे. नगरसेवकानी आता तरी या वाहतुकीच्या समस्येकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
आमदारांची घोषणा विरली हवेतच
गेल्यावर्षी शहरातील समस्या सोडवण्यासंदर्भात एका बैठकीत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शहराच्या विकासाचे नियोजन करण्यासंदर्भात आणि समस्या सोडवण्यासंदर्भात सर्वपक्षीय आणि माजी नगरसेवकासह ज्येष्ठ विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सामूहिक बैठक घेण्याचे जाहीर केले होते. मात्र आमदार विठ्ठल हलगेकर यांची ही घोषणा हवेतच विरली आहे.
राजा छत्रपती चौक, पारिश्वाड क्रॉसपर्यंत मास्टर प्लॅन राबवा
शहरातील राजा छत्रपती चौक ते ज्ञानेश्वर मंदिर, बेंद्रे खुट्ट ते पारिश्वाड क्रॉस हा संपूर्ण भाग मुख्य बाजारपेठेचा आहे. पूर्वी बेंद्रे खुट्ट ते पारिश्वाड क्रॉसपर्यंतच्या रस्त्यावर मुख्य बाजारपेठ होती. मात्र अलीकडे शहराचा विस्तार वाढल्याने नवी बाजारपेठ तयार झाल्याने राजा छत्रपती चौकातूनच बाजाराला सुरवात होत आहे. यासाठी खानापूर शहराच्या पुढील भविष्याचा विचार करून शहरातील राजा छत्रपती चौक ते बेंद्रे खुट्ट तेथून पारिश्वाड क्रॉसपर्यंत मास्टर प्लॅन राबवण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी नगरसेवकानी प्रयत्न करणे गरजेचे आहे.