For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे आज-उद्या वाहतुकीत बदल

11:39 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे आज उद्या वाहतुकीत बदल
Advertisement

शनिवारी सायंकाळी ते रविवार दुपारपर्यंत वाहतुकीला पर्यायी मार्ग

Advertisement

बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. 27 एप्रिल रोजी सायंकाळी व रविवार दि. 28 एप्रिलच्या दुपारपर्यंत शहरातील काही मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शनिवारी सायंकाळी बागलकोट रोड व सुवर्ण विधानसौधपासून होनगापर्यंत राष्ट्रीय महामार्ग व दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडवर, रविवारी होनगापासून सुवर्ण विधानसौधपर्यंत राष्ट्रीय महामार्ग व सर्व्हिस रोडवरील वाहतुकीस व्यत्यय येणार आहे. या पार्श्वभूमीवर पर्यायी मार्गांचा वापर करण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी वाहनधारकांना केली आहे. कोल्हापूर, निपाणीहून येणारी सर्व वाहने संकेश्वरहून हुक्केरीमार्गे तर एम. के. हुबळी, धारवाडहून बेळगावकडे येणारी वाहने नेगिनहाळ, नेसरगी, भेंडीगेरी क्रॉसमार्गे वळविण्याची सूचना करण्यात आली आहे. निपाणी, कोल्हापूर, यमकनमर्डीहून बेळगावकडे येणारी वाहने राम ढाब्याजवळ उजव्या बाजूला वळविण्यात येणार आहेत. बागलकोटहून बेळगावकडे येणारी वाहतूक नेसरगी, गोकाकमार्गे वळविण्यात येणार आहे.

बागलकोट, रायचूर, यरगट्टीमार्गे जाणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसेस कनकदास सर्कल, कणबर्गी, खणगाव, सुळेभावी, मारिहाळ पोलीस स्थानकाच्या क्रॉसपासून वळविण्यात येणार आहेत. बेळगाव शहरातून येडियुराप्पा मार्गावरून अलारवाड ब्रिजकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याची सूचना करण्यात आली आहे. दि. 27 एप्रिलच्या सायंकाळी व 28 एप्रिलच्या दुपारपर्यंत अवजड व मध्यम वाहने बेळगाव शहरात न येता पर्यायी मार्गावरून नेण्याची सूचना करण्यात आली असून पंतप्रधानांच्या जाहीर सभेसाठी येणाऱ्या वाहनांसाठी ज्योतीनगर, येडियुराप्पा मार्ग परिसरातील बळ्ळारी नाला परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. निपाणी, अथणी, चिकोडी, रायबाग, कुडची, संकेश्वर, हुक्केरी परिसरातून येणाऱ्या वाहनांसाठी हलगा-मच्छे बायपास रोडवर पार्किंगची सोय करण्यात आली आहे. बैलहोंगल, बागेवाडी, रामदुर्ग, सौंदत्ती परिसरातून येणाऱ्या वाहनांसाठी अलारवाडजवळील सर्व्हिस रोडवर पश्चिमेला तर गोकाक, अरभावी, घटप्रभाहून येणारी वाहने अलारवाड सर्व्हिस रोडवर पूर्वेला उभी करता येणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.