आधुनिकतेबरोबरच पारंपरिक कलेचाही साज
गणेशाच्या सजावटीसाठी लाकडी मखरला आजही मागणी
बेळगाव : डिजिटलमुळे अनेक पारंपरिक कला लोप पावत आहेत. यामुळे हातामध्ये कौशल्य असणारे कलाकारही कमी होत गेले. मात्र, आजही काही कला जिवंत आहेत. गणेशोत्सव म्हटला की सजावट ही आलीच. या सजावटीसाठी लागणारी लाकडी मखर आजही बेळगावमध्ये तयार केली जाते. मागणी कमी झाली असली तरी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणारे गणेशभक्त मात्र लाकडी मखरीतच गणेशाची प्रतिष्ठापना करतात. गणेशोत्सवाचे स्वरुप दिवसेंदिवस बदलत गेले. पूर्वी गणरायाच्या आगमनापूर्वी जंगलात मिळणाऱ्या फळा-फुलांचा वापर करून सजावट केली जात असे. त्यानंतर लाकडी रंगकाम केलेली मखर बाजारात येऊ लागली.
पारंपरिक रंगकाम करणारे रंगारी मखर तयार करून देत होते. सर्रास घरांमध्ये लाकडी मखरीमध्येच गणेशमूर्तींचे आगमन होत असते. केवळ घरगुतीच नाही तर सार्वजनिक गणेशमूर्तींच्या सजावटीमध्येही लाकडी मखरीचा वापर केला जात असे. मागील दहा-पंधरा वर्षात थर्माकोल बाजारात दाखल झाल्यानंतर लाकडी प्रभावळ व इतर साहित्याची मागणी मंदावली. थर्माकोलमध्ये हव्या त्या आकारात सजावट करता येऊ लागल्याने थर्माकोलला मोठी मागणी वाढली. त्यानंतरच्या काळात डिजिटल प्रिंट करून घेण्याकडे गणेशभक्तांचा कल वाढला. या सर्वाचा परिणाम पारंपरिक रंगकाम करणाऱ्यांवर झाला. बेळगावमध्ये अनेक भागात लाकडी मखर करणारे कारागिर हळूहळू कमी होत गेले.
गोव्याच्या ग्राहकांकडून मागणी
बेळगाव व परिसरातील नागरिक थर्माकोल व डिजिटल प्रिंटकडे वळले असले तरी आजही गोवा व कोकणातील गणेशभक्त पारंपरिक पद्धतीनेच लाकडी सजावट करतात. त्यामुळे बेळगावमध्ये खरेदीला आल्यानंतर लाकडी प्रभावळ खरेदी करण्यासाठी गोवा व कोकणातील ग्राहकांची धावपळ सुरू असते. बेळगावमध्ये काही निवडक कारागिरच हे काम आता करीत आहेत. गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने लाकडी मखरीला रंग देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
लाकडी मखरीलाच प्राधान्य...
पूर्वीच्या काळी गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी लाकडी मखर करून घेतली जात होती. त्या काळी डेकोरेशनचे इतर साहित्य नसल्यामुळे निसर्गात मिळणाऱ्या साहित्याचा वापर करून लाकडी मखर वापरली जात होती. परंतु, कालांतराने थर्माकोल व डिजिटल प्रिंटिंगमुळे याची मागणी कमी झाली असली तरी गोव्यातील नागरिक मात्र लाकडी मखरीलाच प्राधान्य देतात.
-नंदू चचडी, पारंपरिक रंग कलाकार