व्यापाऱ्यांनी एपीएमसीची प्रतिष्ठा राखावी
पालकमंत्री सतीश जारकीहोळी : जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : एकत्रित येऊन तोडगा काढा
बेळगाव : सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून एपीएमसीची उभारणी केली आहे. बेळगाव एपीएमसीची देशात चांगली प्रतिष्ठा आहे. ही प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी एपीएमसी व जयकिसान व्यापाऱ्यांची आहे. एपीएमसी व जयकिसान भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी एकत्रितरित्या येऊन वाद सोडवावा. दोन्ही बाजूंकडून व्यापाऱ्यांनी निर्धारित केलेल्या ठिकाणीच व्यापार करावा. यासाठी व्यापाऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एपीएमसी व जयकिसान भाजी मार्केट व्यापाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी एपीएमसीमध्ये आणखी एक घाऊक भाजीपाला बाजार स्थापन करण्यासाठी सरकारीपातळीवर चर्चा करू. कोणच्याही बाजूने नाही किंवा कोणाच्याही विरोधात नाही चर्चा करण्यात येणार नाही. शामनूर शिवशंकरप्पा हे मंत्री असताना त्यांनी बेळगाव एपीएमसीसाठी 18 कोटी रुपयांचे अनुदान देऊन बाजार विकसित केला, असे त्यांनी सांगितले.
मंत्री शिवानंद पाटील यांच्याशी चर्चा करणार
जयकिसान भाजी मार्पेटच्या व्यापाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मंत्री शिवानंद पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येतील. तसेच एपीएमसी व जयकिसान व्यापाऱ्यांची समस्या आज किंवा उद्या सोडविण्यात येणार नाही. यासाठी दोन्ही बाजारातील व्यापाऱ्यांनी सामंजस्याने व्यवसाय करावा. जय किसान भाजी मार्केटचा परवाना रद्द झाल्यानंतर तेथील व्यापाऱ्यांनी संडे मार्केटमध्ये व्यापार सुरू केला. मात्र काही व्यापाऱ्यांकडून नियमितणे कर भरणा होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या.
यासाठी एपीएमसी आवारात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी करणे भरणे आवश्यक आहे. तसेच संडे मार्केटमधील व्यापाऱ्यांनीही करणे नियमितपणे कर भरावा, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली. आमदार आसिफ सेठ यांनी दोन्ही बाजूंकडील व्यापाऱ्यांना अनुकूल व्हावे, यादृष्टीने पावले उचलून तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली. एपीएमसी सचिव यांनी व्यापाऱ्यांचा थकीत कर व एपीएमसीमध्ये उपलब्ध जागेची माहिती दिली. जयकिसान भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी आपण संडे मार्केटमध्येच व्यापार करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन आदी उपस्थित होते.