भात खरेदीवेळी व्यापाऱ्यांकडून मापात पाप
वजनकाट्यात फेरफार तर प्रत्येक क्विंटलमागे किलोची तूट; शेतकरीवर्ग अडचणीत
प्रतिनिधी/ बेळगाव
भात खरेदीचा दर कमी झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आता काटामारीमुळे फटका सहन करावा लागत आहे. काही व्यापाऱ्यांकडून ‘मापात पाप’ करून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी वजनकाट्यातच दोष तर काही ठिकाणी प्रत्येक पोत्यामागे तूट भरून घेतली जात असल्याने शेतकरीवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
मे महिन्यापासून मेहनत केल्यानंतर आता नोव्हेंबर महिन्यात भातपीक शेतकऱ्याच्या घरी आले आहे. मागील 15 दिवसांत भातपिकाचा दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. व्यापाऱ्यांकडूनच मुद्दाम दर कोसळवून कमी दराने भाताची खरेदी केली जात असल्याचा आरोपही शेतकरी करत आहेत. यातच भात विक्री करताना 81 किलोच्या पोत्यामागे 1 किलो तूट वजा केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याला 80 किलोचेच पैसे दिले जातात. प्रत्येक पोत्यामागे 1 किलो तूट काढल्यास शेतकऱ्याला जबर आर्थिक फटका बसत आहे.
सध्या शेतकामासाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. भात मळणीसाठी तर बेळगाव तालुक्यात पुरुषाला 700 रु. व महिलांना 400 रु. मजुरी द्यावी लागत आहे. या व्यतिरिक्त ट्रॅक्टरचे भाडे व इतर खर्च वेगळाच. त्यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. बेळगाव परिसरात केवळ पावसाच्या पाण्यावर शेती केली जात असल्याने शेतकऱ्यांना भात पिकाशिवाय पर्याय नाही. कोळपणी, भांगलण, कापणी, मळणी यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असून शेवटी व्यापाऱ्यांकडूनही लूट होत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
इलेक्ट्रॉनिक वजन काट्यात फेरफार
सध्या दर कमी झाल्याचे सांगून आपण इतरांपेक्षा अधिक दर देऊ, असे भासविण्याचा प्रयत्न काही भात व्यापारी करीत आहेत. परंतु एकीकडे प्रत्येक क्विंटलमागे 50 ते 100 रु. अधिक दर द्यायचा आणि दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यात फेरफार करायचा, असेही प्रकार सुरू आहेत. मागीलवर्षी रिमोटच्या साहाय्याने वजनकाट्यात फेरफार करताना एका व्यापाऱ्याला पकडून चांगलाच चोप देण्यात आला होता. असे प्रकार यंदाही सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.