For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापुरात व्यापारी संघटनेचा बंद यशस्वी

02:47 PM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
खानापुरात व्यापारी संघटनेचा बंद यशस्वी
Advertisement

मात्र निर्णय नसल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंदच राहणार : शहरातील व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी : आमदारांची शिष्टाई फोल

Advertisement

खानापूर : खानापूर शहरांतर्गतील रस्त्याचे काम धिम्म्यागतीने सुरू असल्याने तसेच शहराची दोन्ही प्रवेशद्वारे बंद असल्याने शहरात बाहेरुन येणाऱ्यांना दुसऱ्या रस्त्याचा अवलंब करावा लागत आहे. याचा परिणाम व्यापाऱ्यावर झाला होता. यासाठी व्यापारी संघटनेने गुरुवारी बंद पुकारुन आंदोलन केले. हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला. मात्र रस्ता सुरू करण्याबाबत निर्णय न झाल्याने पुन्हा रस्ता बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरांतर्गत राजा टाईल्स ते करंबळ क्रॉस या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे.हे काम ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्यात आले होते. मासळी मार्केटजवळील सीडीचे काम हाती घेतले होते. या परिसरातील शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने या रस्त्याचे काम थांबविण्यात आले आहे.

त्यामुळे शहराचे मुख्य प्रवेशद्वारच गेल्या पाच महिन्यापासून बंद झाले आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना तसेच प्रवाशांना चार कि. मी. चा वेडा घालून शहरात प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गानी गुरुवारी बंद पुकारुन मोर्चा काढला होता. हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला. सकाळी 11 वाजता शिवस्मारक येथील शिवाजी पुतळ्याला हार घालून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चा शहरातील विविध मार्गावरुन बसवेश्वर चौकात आला. या ठिकाणी बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीला हार घालून अभिवादन केले. यानंतर मोर्चा शिवस्मारक चौकात आला. तेथून तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन करून घोषणा दिल्या. यावेळी तहसीलदार दुंडाप्पा कोमार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते संजय गस्ती, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट उपस्थित होते.

Advertisement

सहकार्य करण्याचे तहसीलदारांचे शेतकऱ्यांना आश्वासन

यावेळी व्यापारी संघटनेतर्फे महांतेश राऊत यांनी रस्त्याचे काम धिम्म्यागतीने सुरू आहे. तसेच मासळी मार्केटयेथील शेतकऱ्यांनी हा रस्ता वाहतुकीस बंद केल्याने शहरात प्रवेश करणाऱ्यांना फेरा मारुन यावे लागत आहे. याचा परिणाम व्यापारांवर झाला आहे. तसेच रुग्णांना आणि आजारी व्यक्तींना दवाखान्यास पोहचण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी शासनातर्फे योग्य निर्णय घेऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी केली. यशवंत बिरजे यांनीही रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी लावून धरली. यावेळी तहसीलदारानी आपण कायदेशीर बाबींचा विचार करून रस्ता सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. मात्र, व्यापारी आंदोलकानी आजच निर्णय द्यावा, अशी मागणी केली. यावेळी तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. तहसीलदारानी शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करू, तसेच जमिनीचे मोजमाप करून हद्द करून देवू, मात्र, वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्यात यावा, अशी अट शेतकऱ्यांना घातली. मात्र शेतकऱ्यांनी नकार दर्शविला. शेतकऱ्यांच्या बाजूने नेते प्रकाश नाईक, राहूल सावंत, विनायक चव्हाणसह इतर शेतकरी उपस्थित होते.

आमदारांच्या शिष्टाईला नकार 

आंदोलन संपल्यानंतर आमदारानी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आणि शेतकऱ्यांना रस्ता सुरू करण्याबाबत आवाहन केले. मात्र शेतकऱ्यांनी आमदारांच्या शिष्टाईला नकार देत, आपण दोन दिवसानंतर विचार करून निर्णय घेऊ, असे सांगितले. त्यामुळे रस्ता सुरु होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

येत्या दोन दिवसात बैठक घेऊन निर्णय 

शेतकरी राहूल सावंत यांनी तरुण भारतशी बोलताना स्पष्ट केले की,आमच्या जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी आम्ही शेतकरी न्यायालयात दाद मागितली आहे. माणुसकीची जाण ठेवून रस्ता वाहतुकीसाठी खुल्या करण्याबाबत आमच्यावर दबाव घालण्यात येत आहे. मात्र आम्ही शेतकरी ग्रामीण जनतेचा आणि विद्यार्थ्यांचा तसेच प्रवाशांचा विचार करून हा रस्ता एका बाजूने वाहतुकीसाठी खुला करून देण्याच्या विचारात आहोत. मात्र शेतकऱ्यांची येत्या दोन दिवसात बैठक घेऊन निर्णय घेवू, तोपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंदच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

कोरोना काळाची आठवण

अन्य दुकाने वगळता फक्त औषधाची दुकाने सुरू होती. त्यामुळे शहरातील सर्व रस्त्यावर शुकशुकाट होता. अशा पद्धतीचा बंद कोरोना काळात होता. आजच्या बंदमुळे कोरोना काळाची आठवण झाल्याची चर्चा नागरिकांतून होत होती.

Advertisement
Tags :

.