व्यापारी, औद्योगिक संघटनांचे आज आंदोलन
किमान वेतनवाढ सुधारीत आदेशाला विरोध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
बेळगाव : कर्नाटक सरकारने अलिकडेच जाहीर केलेल्या किमान वेतनवाढीच्या सुधारीत आदेशाच्या विरोधात बेळगावातील विविध व्यापारी व औद्योगिक संघटनांनी सोमवार दि. 1 जून रोजी भव्य आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यमबाग येथील चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिजच्या सभागृहात शुक्रवार दि. 29 रोजी व्यापारी व औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष-पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. यामध्ये सरकारच्या निर्णयाविरोधात जिल्हा प्रशासनामार्फत आक्षेप नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी सकाळी 10.30 वाजता राणी चन्नम्मा चौकाजवळील कन्नड साहित्य भवन येथे व्यापारी, उद्योजक व विविध संघटनांचे सदस्य एकत्र येण्याचे ठरले. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचेही ठरले.
निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी
किमान वेतनवाढीमुळे व्यापार, उद्योग तसेच लघु व मध्यम उद्योगांवर अतिरिक्त भार पडणार आहे. सरकारने किमान वेतनवाढ निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती वाणिज्य व उद्योग संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर नागरमुन्नोळी व सचिव सतीश कुलकर्णी यांनी दिली. आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्ह्dयातील व्यापारी व औद्योगिक संघटनांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवून व्यापारी व औद्योगिक क्षेत्राची एकजूट आणि सरकारच्या निर्णयाला सामूहिक विरोध सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.