नाथुला सीमेवरून चीनसोबत व्यापार सुरू
6 वर्षांनी पुन्हा प्रारंभ
वृत्तसंस्था, गंगटोक
सिक्कीम येथील नाथुला खिंडीतून भारत आणि चीनदरम्यान अधिकृत व्यापार पुन्हा सुरू झाला आहे. 6 वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत बंद राहिल्यावर या ऐतिहासिक रेशीम मार्गाचा हा महत्त्वपूर्ण व्यापारी मार्ग पुन्हा खुला करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही देशांदरम्यान सीमावर्ती व्यापाराला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
समुद्रसपाटीपासून 4,302 मीटरच्या उंचीवर स्थित ही रणनीतिक पर्वतीय खिंड भारत आणि तिबेटला जोडणारा एक अत्यंत खास ऐतिहासिक व्यापारी मार्ग मानला जातो. 1962 च्या संघर्षानंतर हा मार्ग बंद करण्यात आला होता. 2006 साली एका कराराच्या अंतर्गत तेथून व्यापार पुन्हा सुरू झाला होता. परंतु 2020 मध्ये कोरोना महामारी आणि गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर हा व्यापार पुन्हा रोखण्यात आला होता.
नाथुला खिंडीतून व्यापार पुन्हा सुरू झाल्याने सुमारे 600 नोंदणीकृत भारतीय व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. हे व्यापारी सीमेवर होणाऱ्या व्यापारावर मोठ्या प्रमाणात निर्भर आहेत. पहिल्याच दिवशी 38 व्यापाऱ्यांना पास जारी करण्यात आले. यावेळी झिरो पॉइंटवर आयोजित सोहळ्यात सिक्कीम सरकार आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी चिनी अधिकारी आणि पीपल्स लिबरेशन आर्मीच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून व्यापाराला पुन्हा सुरुवात केली आहे.
सिक्कीमचे वाणिज्य मंत्री टी.टी. भूतिया यांनी या घटनाक्रमाचे स्वागत करत राज्य प्रशासनाने याप्रकरणी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले. तर स्थानिक व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. मागील 6 वर्षांमध्ये आम्हाला मोठे नुकसान झाले. दोन्ही बाजूच्या व्यापाऱ्यांची मोठी थकबाकी आहे. रेशीम मार्गाचा हा जुन्या व्यापार जारी राहिल अशी अपेक्षा असल्याचे या व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.
व्यापार पुन्हा सुरू होणे भारत आणि चीनदरमयन कूटनीतिक चर्चेचा यशस्वी परिणाम मानला जात आहे. 2025 मध्ये एनएसए अजित डोवाल आणि चीनचे विदेशमंत्री वांग यी यांच्यादरम्यान झालेल्या विशेष प्रतिनिधींच्या 24 व्या बैठकीत नाथुला (सिक्कीम), लिपुलेख (उत्तराखंड) आणि शिपकी ला (हिमाचल प्रदेश)च्या व्यापारी मार्गांना पुन्हा खुले करण्यावर सहमती झाली होती. यानंतर विदेशमंत्री जयशंकर आणि वांग यी यांच्या चर्चेतही या निर्णयावरील सहमतीला आणखी मजबूत करण्यात आले.