अमेरिकेशी व्यापार चर्चा लांबणीवर
टॅरिफमधील बदलाचा परिणाम : ट्रम्पनी 24 तासांत जागतिक टॅरिफ 5 टक्क्यांनी वाढवला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, वॉशिंग्टन
भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार करार (आयटीए) बाबतची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. सरकारी सूत्रांचा हवाला देत बैठक लांबणीवर पडल्याची माहिती रविवारी जारी करण्यात आली. ही बैठक 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान वॉशिंग्टनमध्ये होणार होती. मात्र, पुढील तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तूर्तास भारताला 18 टक्के टॅरिफ भरावा लागत होता, परंतु शुक्रवारी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने सर्व जागतिक टॅरिफ रद्द केल्यानंतर ट्रम्पने प्रथम शुक्रवारी जगभरात 10 टक्के टॅरिफ लादला, नंतर 24 तासांत तो 15 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. अमेरिकेच्या या बदलत्या निर्णयाचा परिणाम भारत-अमेरिका व्यापार चर्चा बैठकीवर झाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या नव्या सुधारित आदेशानंतर आता 15 टक्के जागतिक टॅरिफ लागू होणार आहे. हा कर पूर्वीच्या प्रस्तावित 18 टक्क्यांपेक्षा कमी आहे. परिणामी, दोन्ही बाजूंनी या बदलांचा आढावा घेण्याचा आणि नंतर बैठकीसाठी नवीन तारीख निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. बैठक पुढे ढकलल्याने द्विपक्षीय व्यापार करार लांबणीवर पडू शकतो. भारत आणि अमेरिका व्यापार करासंबंधी एक निश्चित चौकट जारी करण्यात आली आहे. ही चौकट लवकरच अंमलात आणल्यानंतर वाटाघाटी व्यापक द्विपक्षीय व्यापार कराराच्या पूर्णत्त्वाकडे पोहोचतील.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक कर 10 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. सुरुवातीला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जगभरातील देशांवर ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ कर अवैध ठरवले होते. सर्वोच्च न्यायालयाने 6-3 बहुमताने निर्णय देत ट्रम्प यांना ‘आयईईपीए’ कायदा लागू करण्याचा अधिकार नसल्याचा निकाल दिला होता. न्यायालयाच्या या निर्णयामुळे संतप्त होऊन ट्रम्प यांने नवीन कायदा (कलम 122) वापरून जगभरातील देशांवर 10 टक्के कर लादला. हा कायदा जास्तीत जास्त 15 टक्के कर लादण्याची परवानगी देतो. तथापि, हे कर फक्त 150 दिवसांसाठीच लागू असतील. जर ते वाढवायचे असतील तर काँग्रेसची मान्यता आवश्यक असणार आहे.
15 टक्के कर 24 फेब्रुवारीपासून लागू
ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर नवीन कर लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. हा 15 टक्के कर 24 फेब्रुवारीपासून लागू होईल. ट्रम्प यांनी शनिवारी रात्री उशिराने ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये यासंबंधीची घोषणा केली होती. यापूर्वी, ट्रम्प यांनी शुक्रवारी रात्री पत्रकार परिषदेत सर्व देशांवर 10 टक्के सरसकट कर लावण्याची घोषणा केली होती. यापूर्वी त्यांनी शनिवारी कर बेकायदेशीर घोषित करणाऱ्या न्यायाधीशांवर टीका केली.
व्यापार करारामुळे भारताला मिळणार दिलासा
वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी 7 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराची माहिती दिली होती. भारतीय कृषी उत्पादने शून्य कर दराने अमेरिकेला निर्यात केली जातील, तर अमेरिकन कृषी उत्पादनांना भारतात कोणत्याही कर सवलती दिल्या जाणार नाहीत, असे त्यांनी जाहीर केले होते. याव्यतिरिक्त भारताने पुढील पाच वर्षांत अमेरिकेकडून 45 लाख 30 हजार कोटी रुपये किमतीची उत्पादने खरेदी करण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर, अंतरिम व्यापार कराराची (आयटीए) चौकट जाहीर करण्यात आली. या करारांतर्गत, भारतीय वस्तूंवरील अमेरिकेचे शुल्क 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले. याव्यतिरिक्त, रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी भारतावर लादलेले अतिरिक्त 25 टक्के शुल्क देखील मागे घेण्यात आले होते.