कॅनडाची जाहिरात पाहून व्यापार चर्चा रद्द
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा निर्णय : जाहिरातीत अमेरिकेच्या निर्बंधांबद्दल प्रतिकूल टिप्पणी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
कॅनडासोबत सर्व व्यापार चर्चा रद्द करत असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. कॅनडाने फसवणूक करत एक जाहिरात चालविली असून यात माजी अध्यक्ष रोनाल्ड रीगन हे आयातशुल्काच्या विरोधात होते, असे दाखविण्यात आल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. कॅनडाने रीगन यांच्या बनावट जाहिरातीचा गैरवापर केल्याचे रोनाल्ड रीगन फौंडेशनकडून सांगण्यात आले आहे. 1987 मधील रीगन यांच्या भाषणात फेरफार करत ही जाहिरात तयार करण्यात आल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. या व्हिडिओत रीगन हे ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे सर्वसामान्य लोकांवर होत असलेल्या प्रभावाविषयी बोलत असल्याचे दाखविण्यात आले आहे. या जाहिरातीकरता 75 दशलक्ष डॉलर्स (634 कोटी रुपये) खर्च करण्यात आले आहेत.
अमेरिका आणि कॅनडा दोन्ही देश स्टील आणि अॅल्यूमिनियम यासारख्या क्षेत्रांमध्ये करारावर अनेक आठवड्यांपासून चर्चा करत होते, परंतु ट्रम्प यांच्या घोषणेने ही चर्चा पूर्णपणे रोखली गेली आहे. ट्रम्प प्रशासनासोबत व्यापार करार आता शक्य नसल्याचे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी म्हटले आहे.
मनमानी करता येणार नाही
ट्रम्प यांनी यापूर्वीच कॅनडावर 35 टक्के आयातशुल्क लादले आहे. धातूवर 50 टक्के आणि ऑटोमोबाइल्सवर 25 टक्के अतिरिक्त शुल्क लादले होते. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात झालेल्या अमेरिका-कॅनडा कराराच्या कक्षेतील सामग्री मात्र आयातशुल्कापासून मुक्त आहे. व्यापार कराराच्या चर्चेत प्रगती न झाल्यास कॅनडा स्वत:च्या बाजारपेठांमध्ये अमेरिकेला मनमानी पद्धतीने पोहोचण्याची अनुमती देणार नाही. आम्ही आमच्या लोकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारी पावले उचलू असे कार्नी यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांची इच्छा
पंतप्रधान कार्नी हे 8 ऑक्टोबर रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर पोहोचले होते. त्यांनी ट्रम्प यांची भेट घेतली होती. कॅनडा अमेरिकेचा 51 वा प्रांत व्हावा असे ट्रम्प यांनी म्हटले हेते, कार्नी यांना याला थट्टेच्या सुरात घेत वाद टाळला होता.
द्विपक्षीय व्यापार
अमेरिका आणि कॅनडा परस्परांचे सर्वात मोठे व्यापारी भागीदार आहेत. दोन्ही देशांदरम्यान प्रतिदिन जवळपास 15 हजार कोटी रुपयांच्या सामग्री आणि सेवांचे आदान-प्रदान होते. 2024 मध्ये द्विपक्षीय व्यापाराचे एकूण मूल्य 79 लाख कोटी रुपये होते, ज्यात अमेरिकेची कॅनडासोबतची व्यापारी तूट 5.21 लाख कोटी रुपये राहिली होती.