व्यापार कराराला ट्रंप मान्यतेची प्रतीक्षा
भारत-अमेरिका चर्चा अंतिम टप्प्यात, करार शक्य
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराविषयीची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहचली असून हा करार लवकरात लवकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कराराचे प्रारुप सज्ज असून त्याला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
हा करार दोन्ही देशांना लाभदायक ठरणार असून त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. 2030 पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार आणि आयात निर्यात यांचे प्रमाण दुप्पट होईल, असे मानले जात आहे. हे प्रमाण वाढण्यासाठी हा करार कारणीभूत ठरणार आहे, अशीही भावना आहे.
भारताचा भर करसवलतींवर
भारताने अमेरिकेशी चर्चा करताना, भारताच्या कृषी उत्पादनांना अमेरिकेने करसवलत द्यावी, या मागणीवर भर दिला होता. या प्रयत्नाला कितपत यश येते, हे आता प्रत्यक्ष कराराची घोषणा झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. तथापि, करारावरील चर्चा अंतिम टप्प्यात आल्याच्या वृत्ताला अद्याप भारत किंवा अमेरिका यांच्यापैकी कोणत्याही देशाने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले भारतीय प्रतिनिधीमंडळ आता भारतात परत आले आहे. तथापि, या कराराचे प्रारुप आता निश्चित करण्यात आले आहे, असे मानले जात आहे.
भविष्यासाठी दिशादर्शक
भारत आणि अमेरिका यांच्यात प्रारंभी एक प्राथमिक करार होणार आहे. तो करार कशा प्रकारे लागू होतो आणि त्याचे परिणाम काय होतात, हे पाहून नंतर भविष्यात अधिक व्यापक व्यापारी करार केले जातील, अशी चर्चा आहे. कृषी उत्पादनांची बाजारपेठ हाच या चर्चेचा प्रमुख मुद्दा होता. त्यावर एकमत झाले असेल, तर करार व्हावयास वेळ लागणार नाही, असे तज्ञांचे मत आहे. अमेरिकेची मागणी भारताने आपली कृषी बाजारपेठ उघडावी अशी आहे. या मागणीसंबंधी या करारात काय तरतुदी आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या चर्चा एक प्राथमिक करार करण्यासंबंधीचीच आहे, अशी माहिती आहे.
जेमिसन ग्रीर यांची मान्यता
भारत आणि अमेरिका यांच्या प्रतिनिधी मंडळांनी प्रदीर्घ चर्चा करुन कराराचे जे प्रारुप सज्ज केले आहे, त्याला अमेरिकेचे चर्चा प्रमुख जेमिसन ग्रीर यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर, आता केवळ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची मान्यता राहिलेली आहे. भारताच्या चर्चा प्रमुखांनीही हे प्रारुप मान्य केले आहे, अशीही माहिती सूत्रांकडून उपलब्ध होत आहे.