9 लाख 75 हजार वर पोहोचणार ट्रॅक्टर विक्री
आर्थिक वर्षाचा अंदाज : चांगल्या मान्सूनमुळे विक्री वाढणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
कृषी उत्पादनांना योग्य हमीभाव त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रात वाढलेल्या हालचाली आणि चांगल्या मान्सूनच्या अंदाजाकडे पाहता 2025-26 आर्थिक वर्षात एकंदर विक्री 9 लाख 75 हजारवर पोहोचण्याची शक्यता सांगितली जात आहे. क्रीसील या रेटिंग एजन्सीने या संदर्भात अंदाज मांडला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये 9 लाख 45 हजार ट्रॅक्टर्सची विक्री करण्यात आली होती. या आकडेवारीला यंदा मागे टाकण्यामध्ये यश येणार असल्याचाही अंदाज क्रीसीलने व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये विक्रीमध्ये 7 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे. भारतीय हवामान खात्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस यंदा होणार असल्याचे भाकीत वर्तवल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास अधिक दुणावला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी या आनंदवार्तेने उल्हसित झाला आहे. कृषी क्षेत्रासाठी ट्रॅक्टरचे योगदान हे महत्त्वाचे राहिले असून चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे ट्रॅक्टरची मागणी येत्या काळामध्ये वाढली तर नवल वाटायला नको.
ट्रॅक्टर विक्रीस पोषक वातावरण
शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव देण्यासोबतच बांधकाम क्षेत्रातील हालचाली वाढलेल्या असून चांगल्या उत्तम रस्त्यांच्या बांधणीमुळे शेतकऱ्यांना संपर्क व्यवस्था चांगली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हे सर्व वातावरण पाहता ट्रॅक्टरच्या विक्रीमध्ये तीन ते पाच टक्के वाढ होऊ शकते, असेही रेटिंग एजन्सीने मत नोंदवून ठेवले आहे.