भारतीयांमध्ये टोयोटाच्या हायब्रीड कार्सना पसंती
कंपनीने 3 लाख हायब्रीड कार विक्रीचा टप्पा ओलांडला
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतात आपल्या हायब्रीड वाहनांच्या विक्रीत मोठे यश साध्य केले आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, देशातील त्यांच्या हायब्रीड वाहनांच्या एकूण विक्रीने 3 लाख युनिट्सचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. अशाप्रकारे, ही कामगिरी भारतात इंधन-कार्यक्षम आणि कमी प्रदूषण करणाऱ्या वाहनांची वाढती मागणी दर्शवते.
या प्रसंगी, कंपनीचे म्हणणे आहे की टोयोटाच्या हायब्रीड तंत्रज्ञान आणि ब्रँडच्या विश्वासार्हतेवर ग्राहकांचा विश्वास सातत्याने वाढत आहे. याच कारणामुळे हायब्रीड वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ दिसून येत आहे. भारतातील टोयोटाच्या प्रमुख हायब्रीड कार्सने 3 लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला आहे. हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पुढील वाटचालीसाठी दिशादर्शक असाच हा टप्पा ठरलेला आहे.
टोयोटा सध्या भारतीय बाजारपेठेत अनेक हायब्रीड मॉडेल्सची विक्री करत आहे. यामध्ये टोयोटा अर्बन क्रूझर हायब्रीडर, टोयोटा इनोव्हा हायक्रॉस, टोयोटा कॅमरी हायब्रीड आणि टोयोटा वेलफायर यांचा समावेश आहे. उत्तम मायलेज, कमी इंधन वापर आणि पर्यावरणासाठी एक चांगला पर्याय म्हणून या वाहनांकडे पाहिले जात आहे.
पर्यायी इंधन उपायांवरही काम
कंपनीच्या मते, गेल्या तीन दशकात कंपनीने जगभरात 3.8 कोटींहून अधिक विद्युतीकृत वाहने विकली आहेत. कंपनीचा दावा आहे की, यामुळे जागतिक स्तरावर सीओ 2 उत्सर्जन सुमारे 19.7 कोटी टनांनी कमी करण्यास मदत झाली आहे.
हायब्रीड तंत्रज्ञान हे स्वच्छ गतिशीलतेच्या दिशेने : उपाध्यक्ष मनोहर
टोयोटा किर्लोस्कर मोटरचे कार्यकारी उपाध्यक्ष, सबरी मनोहर म्हणाले की, कंपनीच्या महत्त्वपूर्ण इलेक्ट्रिफिकेशन धोरणाचा उद्देश ग्राहकांच्या गरजेनुसार व्यावहारिक आणि विश्वासार्ह गतिशीलतेचे उपाय प्रदान करणे हा आहे. ते म्हणाले की, हायब्रीड
तंत्रज्ञान हे स्वच्छ गतिशीलतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, कारण ते ग्राहकांना कोणत्याही गैरसोयीशिवाय विद्युतीकरण स्वीकारण्याची संधी देते.