टोयोटाची पहिली ईव्ही ‘अर्बन व्रूझर’ पुढील वर्षी होणार लाँच
पूर्ण चार्जवर गाडी 550 किमी धावणार असल्याचा कंपनीचा दावा
नवी दिल्ली :
टोयोटाच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचे नाव अर्बन क्रूझर ईव्ही असे राहणार आहे. इलेक्ट्रिक एसयूव्हीला एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 550 किलोमीटरची रेंज मिळणार असल्याचा दावा कंपनीने यावेळी केला आहे. कंपनीने 12 डिसेंबर रोजी जागतिक बाजारपेठेत इलेक्ट्रिक एसयूव्हीची माहिती जाहीर केली आहे. त्याची संकल्पना आवृत्ती गेल्या वर्षी सादर करण्यात आली होती.
टोयोटा ही इलेक्ट्रिक एसयूव्ही युनायटेड किंगडममध्ये 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत लॉन्च करणार आहे. त्यानंतर, 2025 च्या अखेरीस ती भारतात येऊ शकते. तिची किंमत 23 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते. ही गाडी बाजारात एमजी झेडएस ईव्ही, टाटा कर्व्ह ईव्ही आणि आगामी ह्युंडाई क्रेटा ईव्ही या मॉडेल्सना टक्कर देणार असल्याची माहिती आहे.
टोयोटा अर्बन क्रूझरला ई-विटारापेक्षा वेगळे करण्यासाठी सौंदर्यवर्धक बदल करण्यात आले आहेत. टोयोटा अर्बन क्रूझर हार्टेक्ट-ई प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे, जी कंपनीने मारुती सुझुकीसोबत संयुक्तपणे विकसित केली आहे. व्हीलबेसची लांबी 2,700 मिमी आहे.