For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टोयोटा, महिंद्रा, ह्युंडाईच्या कार विक्रीत समाधानकारक स्थिती

06:39 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
टोयोटा  महिंद्रा  ह्युंडाईच्या कार विक्रीत समाधानकारक स्थिती
Advertisement

मे महिन्यातील आकडेवारी जाहीर : महिंद्राने विकल्या 71,682 कार्स

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बऱ्याचशा ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या मे मधील कार विक्रीचा अहवाल जारी केला आहे. यामध्ये टोयोटा, महिंद्रा आणि महिंद्रा, हुंडई यासह इतर कंपन्यांचा समावेश आहे.  साधारण आकडेवारी पाहिल्यास एप्रिलच्या तुलनेमध्ये मे मध्ये कार विक्रीमध्ये कंपन्यांनी चांगले प्रदर्शन केले आहे. अनेक कंपन्यांच्या कार विक्रीमध्ये वाढ दिसून आली आहे. टोयोटाच्या कार विक्रीमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली असून  ह्युंडाईच्या कार विक्रीतसुद्धा चांगली वाढ दिसली आहे.

Advertisement

टोयोटाने विकल्या 25,273 कार्स

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने मागच्या महिन्यात कार विक्रीमध्ये 24 टक्के वाढ दर्शवली आहे. मे महिन्यात कंपनीने 25,273 वाहनांची विक्री केली आहे. मे 2023 मध्ये हीच विक्री 20,410 इतकी होती. कार विक्रीमध्ये कंपनीने 1314 कार्स विदेशात निर्यात केल्या आहेत. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनीने आवश्यक ते बदल करत उत्पादन व सेवा या दोन्ही घटकांवरती अधिक लक्ष केंद्रित केले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या कारणास्तवच ग्राहकांचा कार खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

महिंद्राच्या कार्स विक्रीत 17 टक्के वाढ

महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीने मे महिन्यामध्ये कार विक्रीत 17 टक्के वाढ नोंदवली आहे. सदरच्या महिन्यामध्ये कंपनीने 71,682 कार्सची विक्री केली आहे. मागच्या वर्षी याच महिन्यामध्ये कार विक्रीची संख्या 61,415 होती. मागच्या महिन्यात देशांतर्गत बाजारात महिंद्राने 31 टक्के वाढीसह 43,218 प्रवासी वाहनांची विक्री केली आहे. मे 2023 मध्ये प्रवासी वाहनांची विक्री 32,886 इतकी होती. मागच्या महिन्यात विदेशामध्ये निर्यातीत 2 टक्के वाढ झाली असून 2671 वाहनांची निर्यात कंपनीने केली आहे. त्यांच्या ट्रॅक्टर विक्रीत 9 टक्के इतकी वाढ झालेली आहे. जवळपास 37,109 ट्रॅक्टरची विक्री मागच्या महिन्यात कंपनीने केली आहे. मागच्या वर्षी याच महिन्यामध्ये 34,126 ट्रॅक्टरचा खप झाला होता.

ह्युंडाईचीही विक्रीत कमाल

ऑटोमोबाईल क्षेत्रातील आणखी एक दिग्गज कंपनी ह्युंडाई यांनीसुद्धा मागच्या महिन्यात कार विक्रीत 7 टक्के वाढ नोंदवलीय. 63,551 कार्सची विक्री मे मध्ये कंपनीने केली होती. याच महिन्यामध्ये मागच्या वर्षी कंपनीला 59,601 गाड्यांची विक्री करणे शक्य झाले होते. मागच्या महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये ह्युंडाईची विक्री 1 टक्के वाढली आहे. देशांतर्गत बाजारामध्ये 49,151 गाड्यांची विक्री झाली आहे तर दुसरीकडे 31 टक्के निर्यात वाढीसह 14,400 गाड्यांची निर्यात मे महिन्यात कंपनीने केली आहे.

याच दरम्यान किया इंडियाने देखील मे महिन्यात 4 टक्के कार विक्रीत वाढ नोंदवली आहे. मागच्या महिन्यात 19,500 वाहनांची विक्री कंपनीने केली आहे. 2023 मध्ये मे महिन्यात 18,766 गाड्यांची विक्री केली होती.

Advertisement
Tags :

.