श्रीमंतीच्या दिशेने...
देशातील अब्जाधीशांच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ पाहता या आघाडीवर भारतीयांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे दिसून येते. मागच्या काही वर्षांत श्रीमंत भारतीयांच्या संख्येत वाढच होत असून, यंदा 13 नव्या अब्जाधिशांसह भारतीय अब्जोपतींचा आकडा 284 वर गेल्याचे आकडेवारी सांगते. मुख्य म्हणजे या सर्वांची एकूण संपत्ती ही देशाच्या सकल उत्पन्नाच्या म्हणजेच जीडीपीच्या एक तृतीयांश असल्याचे ‘हुरून ग्लोबल रिच लिस्ट’मधून समोर आली आहे. सध्या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्याकडे पाहिले जाते. मस्क यांची संपत्ती तब्बल 82 टक्क्यांनी वाढली असून, त्यांनी आपले स्थान कायम राखल्याचे पहायला मिळते. आजमितीला त्यांची संपत्ती 34.32 लाख कोटी इतकी असून, त्यांच्या पाठोपाठ जेफ बेजोस, मार्क झुकरबर्ग, लॅरी अॅलिसन, वॉरेन बफे अशी क्रमवारी असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. किंबहुना, पहिल्या टॉप टेनमध्ये या यादीत कोणत्याही भारतीयाचा समावेश दिसत नाही. वास्तविक रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा पहिल्या दहांमध्ये समावेश होता. तथापि, वाढत्या कर्जामुळे मागच्या वर्षीपेक्षा अंबानी यांच्या संपत्तीत जवळपास 1 लाख कोटी ऊपयांनी घट झाली. पहिल्या दहा क्रमांकामध्ये त्यांना स्थान न मिळण्यास हीच बाब कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. असे असले, तरी आशियातील तसेच भारतातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी यांनी आपले स्थान टिकवून ठेवल्याचे अधोरेखित होते. अंबानी यांची 8.6 लाख कोटी इतकी संपत्ती असून, त्यांनी उद्योगपती गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. मागच्या काही वर्षांत अदानी यांच्या संपत्तीचा वारूही चौखूर उधळत आहे. एकूणच आकडेवारीचा विचार करता जागतिक स्तरावर त्यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसते. त्यांची संपत्ती 1 लाख कोटी ऊपयांनी वाढली असून, त्यांच्यात आणि अंबानींमध्ये फारसे अंतर असल्याचे दिसत नाही. या दोघांशिवाय एचसीएल कंपनीच्या प्रमुख आणि महिला उद्योजिका रोशनी नाडर यांची कामगिरीही उजवी ठरावी. 3.5 लाख कोटी संपत्तीसह रोशनी या देशातील सर्वांत श्रीमंत भारतीय ठरल्या असून, ही समस्त महिलांसाठी अभिमानास्पद बाब ठरावी. मुख्य म्हणजे जागतिक स्तरावरील पाचव्या श्रीमंत महिला म्हणून त्यांचे नाव पुढे आले आहे. यातूनच त्यांच्या कार्यकर्तृत्वाची प्रचिती यावी. याशिवाय दिलीप संघवी, अजीम प्रेमजी, कुमार मंगलम बिर्ला यांनीही आपला आलेख कायम राखला असून, अब्जाधिशांच्या संख्येत नव्याने पडलेली भर आशादायकच म्हणावी लागेल. मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी. जीवाच्या या मुंबईने अनेकांना मोठे केले. यादीत मुंबापुरीतील 90 अब्जाधिशांचा समावेश होणे, हे बरेच काही सांगते. शांघायमध्ये 92, तर बीजिंगमध्ये 91 अब्जाधिश नोंदवले गेले असले, तरी मुंबईतून नव्याने 11 जणांची पडलेली भर या शहरातील क्रयशक्तीचाच नमुना ठरावी. भारत आणि चीनची तुलना करायची झाल्यास भारतातील अब्जाधिशाची सरासरी संपत्ती ही 34 हजार 514 ऊपये कोटी इतकी आहे. तर चीनमध्ये ही संपत्ती 29 हजार 25 कोटी इतकी असल्याचे दिसून येते. भारतीय अब्जाधिशांबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्या संपत्तीत 10 टक्के इतकी वाढ झाली आहे. ही वाढ थोडीथोडकी म्हणता येणार नाही. भारतीयांच्या एकत्रित संपत्तीचा आकडा धरला, तर तो 98 लाख कोटी ऊपयांवर जातो. हा आकडा भारताच्या जीडीपीच्या सुमारे एक तृतीयांश म्हणजे 33 टक्के इतका असल्याचे सांगण्यात येते. अर्थात देशातील दोन, अडीचशे व्यक्तींकडे इतकी मोठी संपत्ती असणे, हेही सुखावह चित्र ठरू नये. मागील वर्षी देशातील आर्थिक असमानतेबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. या अहवालात भारतातील केवळ एक टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती असल्याचा, तर 99 टक्के लोकांकडे 60 टक्के इतकी संपत्ती असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. खरे तर गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी वाढत असल्याचेच हे द्योतक ठरावे. 1991 मध्ये भारताने खुल्या आर्थिक धोरणाचा पुरस्कार केला. खुल्या आर्थिक धोरणाची अनेक चांगली, वाईट फळे देशाला चाखायला मिळाली. 91 नंतर सर्वसामान्य व मध्यमवर्गातील नागरिकांचे जीवनमान उंचावले, तर उच्च उत्पन्न गटातील मंडळींचा आलेखही उंचावत गेला. मागच्या काही वर्षांचा धांडोळा घेतला, तर उद्योगपतींच्या संपत्तीत अतिशय जलदगतीने वाढ झाल्याचे दिसते. भारतातील श्रीमंतांची संख्या वाढणे, अब्जाधिशांच्या यादीत नव्याने भर पडणे, ही आनंददायकच गोष्ट ठरावी. आज अशा श्रीमंत भारतीयांचा आकडा लक्षात घेतला, तर जगात भारताने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. भविष्यात या आघाडीवर भारत पहिले स्थान पटकावेल, अशी आशाही आपल्याला बाळगता येईल. तसे आज भारताकडे जगातिक महाशक्ती म्हणून पाहिले जाते. विकसित व प्रगतशील देश म्हणून भारताने जगभर नावलौकिक मिळविला आहे. परंतु, केवळ अब्जाधिश भारतीयांची संख्या वाढणे म्हणजे प्रगती नव्हे, हेही लक्षात घेतले पाहिजे. सध्या देशासमोर कितीतरी समस्या आ वासून उभ्या आहेत. दारिद्र्या, बेरोजगारी यांसारखे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर रूप घेताना दिसत आहेत. अशा वेळी केवळ हातावर हात ठेऊन वा गप्प राहून चालणार नाही. गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कशी दूर करता येईल, यावर कटाक्ष हवा. अर्थात त्याकरिता अब्जाधिश मंडळींनाही आपले उत्तरदायित्व स्वीकारावे लागेल. देशातील अनेक उद्योगपती वेगवेगळ्या आघाड्यांवर अगोदरपासूनच काम करत असून, देशकार्यात योगदान देत आहेत. तथापि, या आघाडीवर सरकारच्या सोबतीने अधिक व्यापक रीतीने व नियोजनबद्धरीत्या कसे काम करता येईल, याचा रोडमॅप तयार करायला हवा. श्रीमंत होण्याचा प्रवास अधिक प्रशस्त व्हावा, इतकेच.