For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लिथीयम बॅटरी उत्पादनात स्वयंपूर्णतेकडे

06:44 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
लिथीयम बॅटरी उत्पादनात स्वयंपूर्णतेकडे
Advertisement

आत्मनिर्भरतेच्या दिशेने आणखी एक पाऊल, निर्यातीतही अग्रगण्य स्थान मिळणे शक्य

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सध्याच्या काळात लिथीयम बॅटरी हा परवलीचा शब्द बनला आहे. या बॅटरीचा उपयोग वीजेवरची वाहने, संगणक, मोबाईल, स्मार्टफोन्स, टॅब आणि जवळपास सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये अत्यावश्यक असतो. त्यामुळे विद्यमान काळात आणि भविष्यकाळात या बॅटरीजना अन्यन्यसाधारण महत्व प्राप्त होत आहे. भारत आता या बॅटरीजच्या उत्पादनाचे जागतिक केंद्र बनण्यासाठी सज्ज होत आहे.

Advertisement

नुकतेच भारतात लिथीयम या दुर्मिळ आणि मौल्यवान धातूचे मोठे साठे सापडले आहेत. काही साठ्यांमधून उत्पादनलाही प्रारंभ झाला आहे. परिणामी भारतात लिथीयम अयॉन बॅटरीचे उत्पादन करणारी केंद्रे स्थापन झालेली आहेत. अशी पाच उत्पादन केंद्रे स्थापन होत आहेत, अशी माहिती केंद्रीय मार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ‘इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन‘च्या एका कार्यक्रमात मंगळवारी दिली. लिथीयम बॅटरी उत्पादनात भारत क्रमांक एकचा देश हाऊ शकतो. तसेच या बॅटऱ्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात करु शकतो. देशाची आवश्यकताही देशातच भागवू शकतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.

किमतीही झाल्या कमी

प्रारंभीच्या काळात या बॅटरीजची किंमत 150 डॉलर प्रतिकिलोवॅट प्रतितास अशी होती. पण आता मोठ्या प्रमाणात भारतात उत्पादन होत असल्याने ती 108 ते 110 डॉलर्स अशी कमी झाली आहे. पाच कंपन्यांनी भारतात त्यांचे उत्पादन करण्यास प्रारंभ केला आहे. आजवर सारे जग केवळ चीनवर या उत्पादनासाठी अवलंबून होते. मात्र, आता चीनचे हे स्थान नजीकच्या भविष्यकाळात भारताकडे येऊ शकते, असे उत्साहवर्धक विधान नितीन गडकरी यांनी केले आहे.

5 लाख कोटीची क्षमता

येत्या दशकभरात भारत अशा बॅटऱ्यांचे 5 लाख कोटी रुपये किमतीचे वार्षिक उत्पादन करु शकतो. या क्षेत्राचा आतापर्यंतचा विकासदर पाहिला तर हे ध्येय गाठणे सहजसाध्य आहे. भारतात वीजेवर चालणाऱ्या कार्सची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भविष्यकाळात हा एक मोठा व्यवसाय म्हणून विकसीत होणार असून जगभरात अशा कार्सना मागणी प्रचंड वाढणार आहे. विद्युत वाहने प्रदूषणमुक्त असल्याने पर्यावरणाच्या संरक्षणासाठीही ती अत्यंत उपयुक्त आहेत. येत्या 25 वर्षांमध्ये पेट्रोलियम इंधनाचा उपयोग पूर्णपणे थांबवण्याचा विश्वसमुदायाचा निर्धार आहे. अशा स्थितीत विजेवर चालणारी वाहने हाच वाहतुकीचा आधार असतील. हैड्रोजन या स्वच्छ इंधनाच्या निर्मितीतही भारत जगातील एक प्रबळ राष्ट्र होणार आहे, असे ठाम प्रतिपादन या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी केले आहे.

केंद्र सरकारची व्यापक योजना

भारतात हैड्रोजन आणि इतर प्रकारच्या स्वच्छ इंधनाची निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हावी, असा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रयत्न आहे. त्यासाठी व्यापक योजनाही सज्ज करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे लिथीयम उत्पादनातही आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न आहे. भारतात सापडलेले लिथीयमचे साठे उत्साह वाढविणारे आहेत. त्यांचा योग्य उपयोग केल्यास ते अर्थव्यवस्थेचा कणा बनू शकतात, असे तज्ञांचेही मत आहे. मात्र, त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता आहे.

भारताला मोठी संधी

ड लिथीयम अयॉन बॅटरीच्या निर्यात बाजारात मिळू शकते महत्वाचे स्थान

ड भारताची अशा बॅटऱ्यांची आवश्यकताही भागू शकते देशी उत्पादनामुळे

ड भारतात सापडलेले लिथीयम साठे भविष्यात अर्थव्यवस्थेचा आधार होणार

ड प्रदूषणमुक्त ऊर्जा आणि इंधननिर्मितीसाठी भारताच्या अनेकविध योजना

Advertisement
Tags :

.