For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नव्या युगाच्या दिशेने...

06:41 AM Feb 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
नव्या युगाच्या दिशेने
Advertisement

परिवर्तन किंवा स्थित्यंतर हा जगाचा नियम आहे. जग कधीही स्थिर नसते. त्यात कायम बदल होत असतात. संगणकाने क्रांती घडवली, तेव्हा सांप्रत युगाला संगणकयुग असे नामाभिधान मिळाले. किंबहुना, संगणक हातात स्थिरावून आता कैक काळ लोटला आहे. त्याची जागा आता एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तासारख्या तंत्रज्ञानाने घेतली आहे. कोणत्याही घटकामुळे वा तंत्रज्ञानामुळे जगामध्ये जेव्हा उलथापालथ होते, त्याचे दूरगामी परिणाम संभवतात, तेव्हा त्यातून नव्या युगाची चाहूल लागते. एआयबद्दल असेच म्हणता येईल. त्या अर्थी नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये सुरू झालेल्या ‘इंडिया एआय

Advertisement

इम्पॅक्ट समिट’ला विशेष महत्त्व होय. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ हे या परिषदेचे ब्रीद आहे. कोणत्याही तंत्रज्ञानाचा, मॉडेलचा उपयोग हा समाजाच्या कल्याणासाठी व्हायला हवा. त्यातून सर्वांचे हित आणि सुख साधले जावे, हेच भारतीय संस्कृती सांगते आणि या बीद्रवाक्यातूनही हाच विचार अधोरेखित होतो. महात्मा गांधी यांच्या काळातही तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यातील संघर्षावर बराच ऊहापोह आपण ऐकत, वाचत आलो आहोत. गांधींचा मूलत: तंत्रज्ञानाला विरोध नव्हता. तंत्रज्ञानामुळे माणसाचा रोजगार हिरावला जात असेल, तर आपला त्याला विरोध असेल, असे गांधींनी म्हटले होते. आज एआय तंत्रज्ञानाचा विस्तार होत असतानाही गांधींच्या या विधानाची चर्चा करावी लागेल. एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. याच्या अर्थातून त्याचे व्यापकत्व सिद्ध होतेच. शिवाय त्याच्या मर्यादाही स्पष्ट होतात. कोणत्याही कृत्रिम बाबींना मर्यादा या असतातच. रोबोट आला, तेव्हा आता माणसांचे काही काम उरणार नाही, अशा प्रकारच्या शंकाकुशंका व्यक्त केल्या गेल्या. तथापि, रोबोट आल्यानंतरही माणसाच्या बुद्धिमत्तेचे महत्त्व अबाधितच राहिले. कारण रोबोट ही माणसाची निर्मिती आहे आणि अंतिमत: त्याच्यावर मानवाचेच नियंत्रण आहे. आज एआयचा कितीही बोलबाला असला, तरी त्याच्याबद्दलही असेच म्हणता येईल. एआय निश्चितच सर्वस्पर्शी आहे. कृषी, शिक्षण, आरोग्य, विज्ञान, संशोधनासह सर्वच क्षेत्रांना आज एआयने व्यापले आहे. त्यामुळे जशा संधी निर्माण होत आहेत, तशी काही आव्हानेही उभी राहिली आहेत. परंतु, कोणत्याही आव्हानाचे संधीत रुपांतर करणे महत्त्वाचे होय. अनेक क्षेत्रांमध्ये कमी अधिक प्रमाणात एआय आल्याने त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. काही ठिकाणी मनुष्यबळही कमी करावे लागू शकते. परंतु, एआयमधून नवे पर्यायही उभे राहू शकतात. एआयमधून उपलब्ध माहितीचा खजिनाच उपलब्ध होतो व त्यातून हवी ती आशयनिर्मिती करता येते, हे आपण जाणतो. परंतु,  या माहितीतील सत्यता वगैरे गोष्टी पडताळून पाहणेही आवश्यक असते, याचे भान संबंधितांकडून बाळगले गेले पाहिजे. उद्या एआयचा वापर करून आपण, लेखक, कवी, पत्रकार काहीही होऊ शकतो, असे कुणास वाटेल. पण, एआय हे एक साधन आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. एक पूरक साहित्य म्हणूनच त्याचा उपयोग करणे शहाणपणाचे. मुळात एआय हा सांगकाम्या आहे. प्रॉम्प्टप्रमाणे तो हालचाली करतो, माहिती देतो. त्यापलीकडे तो जाऊ शकत नाही. या त्याच्या मर्यादा आहेत. म्हणूनच युग कितीही बदलले, तरी प्रतिभा आणि क्रिएटिव्हीटीचे महत्त्व कायम राहणार. किंबहुना, आजचे जग हे घड्याळाच्या काट्यावर चालणारे आहे. अशा वेगवान जगात तुम्हाला सुपरफास्ट राहण्यासाठी एआयसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणे क्रमप्राप्त ठरते. अर्थात तो कसा आणि कुठे करावा, याचे तुमच्याकडे कौशल्य हवे. एआय ही दुधारी तलवार आहे. यातील धोके कमी करून संधीचा अधिकाधिक वापर करण्यावर सरकारचा भर असल्याचे देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजयकुमार सूद यांनी म्हटले आहे. हीच आपली दिशा असायला हवी. एआयचा मुलांवर नेमका काय परिणाम होतो, यावर अजून नेमकेपणाने प्रकाश पडलेला नाही. मुलांना शालेय जीवनात पडणारे प्रश्न, हे अतिशय महत्त्वाचे असतात. कारण त्यातूनच त्यांची जडणघडण होते. हे बघता एआयसारखे तंत्रज्ञान अगदी लहानपणी त्यांच्या हाती आले, तर त्यांच्यातील जिज्ञासू वृत्ती व मानसिक आरोग्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही ना, यावर आणखी सखोल अभ्यास व्हायला हवा. आजची मुले म्हणजे उद्याचे संशोधक. म्हणूनच मुलांच्या हातात हे दुधारी शस्त्र देण्याआधी आपल्याला विचार करावा लागेल. नवी दिल्लीतील ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, सर्बिया, ताजिकिस्तान, एस्टोनिया आणि अफ्रिया यांसारख्या 13 देशांच्या दालनांचा समावेश आहे. यात देश विदेशातील मिळून अडीच लाखांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित असतील. वाढीला चालना देणे, नवे रोजगार शोधणे, सार्वजनिक सेवा सुधारणे आणि जगभरातील लोकांना फायदा मिळवून देणे, यादृष्टीने आम्ही एआयच्या परिषदेकडे पाहत असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड लॅमी यांनी म्हटले आहे. भारताला एआयकरिता स्पष्ट धोरण आखतानाच रोजगार क्षमता कशी वाढेल आणि इतर क्षेत्रांना त्याचा कसा लाभ होईल, यावर लक्ष्य केंद्रित करावे लागेल. सध्या अमेरिका आणि चीन हे देश एआय तंत्रज्ञानात आघाडीवर आहेत. ब्रिटन, कॅनडासारखे देशही पुढची पाऊले टाकताना दिसतात. त्यामुळे भारतालाही मागे राहून चालणार नाही. मागील वर्षी एआयसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद असतानादेखील अर्धी रक्कमही वापरली गेली नाही. त्यामुळे या वेळी एक हजार कोटी रुपये इतकीच तरतूद करण्यात आली आहे. या दोन्ही बाबी भूषणावह ठरू नयेत. एआयसाठी भरघोस तरतूद होणे आणि या आर्थिक निधीचा पुरेपूर वापर होणे, या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यातूनच भारत नव्या युगात प्रवेशेल, ही निश्चित.

Advertisement
Advertisement
Tags :

.