युद्धविरामाच्या दिशेने..
इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात झालेली 10 दिवसांची शस्त्रसंधी सद्यस्थितीत आशादायकच म्हणता येईल. मागच्या साधारण दीड महिन्यांपासून अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण तसेच लेबनॉन यांच्यात युद्धसंघर्ष सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण जग वेठीस धरले गेले असताना शस्त्रसंधी झाल्याने युद्धविरामाची शक्यता बळावली आहे.
युद्धाच्या कथा कितीही रम्य वाटल्या, तरी प्रत्यक्ष युद्धाची दाहकता ही भयंकरच असते. युद्धातून केवळ जीवित किंवा वित्त हानीच होते, असे नाही. तर अनेकपदरी नुकसान होते. संयुक्त राष्ट्रांचा अहवाल हेच सांगतो. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि युद्धाच्या परिस्थितीमुळे भारतातील सुमारे 25 लाख लोक गरिबीच्या खाईत लोटले जाण्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालानुसार, इंधन, माल वाहतूक आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या क्रयशक्तीवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक अर्थकारणावरही त्याचा परिणाम होण्याचा इशारा देण्यात आला आहे. वास्तविक, हे युद्ध जितके लांबेल, तितकी त्याच्या परिणामांची तीव्रताही वाढू शकते. त्यामुळे युद्धविरामाची चिन्हेही दिलासादायक ठरतात. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धसंघर्ष यापूर्वीच थांबला असून, दोन देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. अणूमहत्त्वाकांक्षेसह काही मुद्द्यांवर दोन देशांमध्ये मतभेद कायम असले, तरी संवाद होणे, ही बाब सकारात्मक म्हणावी लागेल. या पार्श्वभूमीवर इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील दहा दिवसांची शस्त्रसंधी हीदेखील महत्त्वपूर्ण घटना ठरते. लेबनॉनमधील हिज्बुल्ला संघटना आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष नवा नाही. तथापि, या संघर्षाने अलीकडच्या महिनाभरात वरचे टोक गाठल्याने युद्धविरामाच्या शक्यता पुन्हा धूसर झाल्या होत्या. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि लेबनॉनचे अध्यक्ष जोफे औन यांच्यातील संवादामुळे येथील वातावरण निवळल्याचे दिसून येते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच याविषयीची घोषणा केल्याने युद्धाचा वणवा कमी होईल, असे मानायला जागा आहे. अमेरिका, इस्रायलच्या तुलनेत इराण वा तत्सम देश चिमुकले ठरावेत. परंतु, होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या माध्यमातून त्यांनी जगाची केलेली कोंडी अभूतपूर्व ठरली. जगाचा 20 टक्के व्यापार अवलंबून असणारी ही सामुद्रधुनी पूर्णपणे कधी खुली होणार, याकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. चीननेही होर्मुझमधून मुक्त आणि सुरक्षितपणे वाहतूक करण्याचे स्वातंत्र्य द्या, अशा प्रकारची मागणी पहिल्यांदाच केलेली दिसते. परंतु, संपूर्ण युद्धविरामाची घोषणा झाल्याशिवाय हा मार्ग निर्वेध होणार नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. या सगळ्या अनुकूल घटना घडत असताना अमेरिकन सैन्याने 12 वर्षांनंतर सीरियातून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिका आणि सीरिया यांच्यातील संबंध दशकांपासून बिघडलेले होते. परंतु, डिसेंबर 2024 मध्ये बशर अल असद यांची सत्ता गेल्यानंतर त्यात सुधारणा झाली. दोन देशांमध्ये संवाद प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सीरियावरील बहुतेक निर्बंधही उठवण्यात आले होते. दुसऱ्या बाजूला सीरियातील सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस ही संघटना प्रामुख्याने अमेरिकेच्या पाठिंब्यावर अवलंबून होती. तथापि, अमेरिकेची माघार हा टर्निंग पॉईंट म्हणता येईल. आता एसडीएफला सीरियन सरकारच्या अटी मान्य कराव्या लागलेल्या दिसतात. स्वाभाविकच अमेरिका व सीरियात यांच्यातील इतक्या वर्षांचा संघर्ष संपुष्टात येत असेल, तर सोन्याहून पिवळे. अलीकडेच रशिया आणि युक्रेन यांच्यातही तात्पुरती युद्धबंदी झाली. सगळे जग अशांततेच्या वादळात सापडले असताना युद्धविरामाच्या दिशेने अशी पाऊले पडणे, निश्चितच सकारात्मक होय.