शतप्रतिशतच्या दिशेने...
लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद, महापालिका निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपने मारलेली बाजी म्हणजे खऱ्या अर्थाने शतप्रतिशतच्या दिशेने टाकलेले दमदार पाऊलच म्हटले पाहिजे. एकेकाळी केवळ दोन खासदार असलेल्या भारतीय जनता पक्षाचा मागच्या काही वर्षांतला प्रवास हा थक्क करणाराच म्हणता येईल. 2014 मधील मोदी लाटेपासून भाजपाने मागे वळून पाहिलेले नाही. मागील दहा ते बारा वर्षांत देशातील अनेक राज्ये त्यांनी पादाक्रांत केली. पूर्वी शहरी भागातील पक्ष म्हणून भाजपाची हेटाळणी केली जायची. परंतु, महापालिका, नगरपालिकेतील वर्चस्वाबरोबरच झेडपी निवडणुका जिंकून ग्रामीण भागातही आपण हातपाय पसरल्याचे भाजपाने ठामपणाने दाखवून दिले आहे. झेडपी व पंचायत समितीतील यश तेच सांगते. शहरी, निमशहरी भागात पक्ष आधीपासूनच मजबूत स्थितीत होता. परंतु, आता गावखेड्यातही कमळ फुलल्याचे दिसून येते. सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, सिंधुदुर्ग, धाराशिव या काँग्रेस वा सेनेच्या बालेकिल्ल्यांमध्ये चौखूर उधळलेला भाजपाच्या विजयाचा वारू पक्ष कोणत्या दिशेने चालला आहे, यावरच प्रकाश टाकतो. रत्नागिरी, रायगडमध्ये शिंदेसेना, पुणे, कोल्हापूरमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी, लातूरमध्ये काँग्रेस, तर सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने वर्चस्व मिळविल्याचे हा निकाल सांगतो. तथापि, एकूण 731 पैकी 225 जागांवर भाजपने मारलेली मजल गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा निर्विवाद विस्तार असल्याचेच निदर्शक होय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या नरेटिव्हने भाजपाला धक्का बसला. 40 ते 45 जागांमध्ये अडकणाऱ्या काँग्रेसने 100 जागांपर्यंत मुसंडी मारली. त्या धक्क्यातून सावरलेल्या भाजपाने अजिबात गाफील न राहता प्रत्येक निवडणूक प्राणपणाने लढल्याचे दिसून येते. झेडपीतील यशही त्याचाच परिपाक. भाजपाने शतप्रतिशतचा नारा देऊन अनेक वर्षे लोटली. तथापि, त्या दिशेने आता खऱ्या अर्थाने पक्षाचा प्रवास सुरू झालेला दिसतो. अनेक राज्यांमध्ये आज भाजपचा झेंडा फडकला आहे. महाराष्ट्र विधानसभेपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाने जिंकल्या आहेत. त्यामुळे 2029 मध्ये स्वबळावर लढण्याचा मार्ग आता अधिक मोकळा झाला आहे. सत्तेच्या राजकारणाकरिता भाजपाने महाराष्ट्रात सेना, राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडले. परंतु, या पक्षांचे लोढणे फार काळ भाजपवाले सहन करतील, असे समजू नये. प्रादेशिक पक्षांना भाजपने कसे गिळंकृत केले, याचा इतिहास फार जुना नाही. त्यामुळे 2029 च्या निवडणुकीत अमित शाह यांनी म्हटल्याप्रमाणे कुबड्या दूर सारल्या जाऊ शकतात. दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष दिवसेंदिवस अधिकाधिक कमजोर होऊ लागले आहेत. विधानसभेनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांनी भाजपला बाय देऊन टाकला की काय, याची शंका यावी, अशी स्थिती पहायला मिळते. देशात काही अपवाद वगळता विरोधकांनी नांगीच टाकल्याचे दिसते. विरोधकांची आर्थिक रसदही तुटल्याने किंवा तोडल्याने भविष्यात ते कसे उभे राहतील हा प्रश्न आहे. त्यामुळे शतप्रतिशतपासून भाजपा फार दूर नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था. परंतु, संघ व भाजप नेतृत्वामध्येही सुप्त संघर्ष असल्याचे बोलले जाते. सरसंघचालक मोहन भागवत यांचे ‘संघामुळेच भाजपला चांगले दिवस आले आहेत,’ हे ताजे विधान त्या अर्थी सूचक ठरावे. 1925 ला संघाची स्थापना झाली. अनेक संकटे झेलत, टक्के टोणपे खात संघाची वाटचाल होत राहिली. आधी जनसंघ, मग भारतीय जनता पक्ष या माध्यमातून संघ राजकारणात पडद्याआडून काम करत राहिला. पूर्वी अनेक राज्यांमध्ये भाजप औषधालाही नव्हता. मात्र, संघाच्या पाठबळावर भाजप वाढू लागला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक संघटना आहे, असाच संघाचा अनेक वर्षे दावा असे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांमध्ये स्वयंसेवक उघडपणे प्रचारात सक्रिय झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींना भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. तसा सल्ला संघानेच दिल्याचे सांगितले जाते. त्यानुसार मोदी यांचे नाव पुढे आणण्यात आले. निवडणूक प्रचारात काँग्रेसविरोधात रान उठवत मोदींनी देशात भाजपची सत्ता खेचून आणली. नंतरच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये भाजपला संघाचे नेटवर्क, मोदी व अमित शाह यांची व्यूहनीती याचा लाभ झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. प•ा यांनी आम्हाला आता निवडणुकीत संघाची गरज नाही, असे वक्तव्य केल्याने संघ वर्तुळातील मंडळी नाराज झाली. त्याचा फटकाही निवडणुकीत बसला. मात्र, त्यानंतर संघ-भाजप यांच्यातील संवाद, संपर्क वाढला. त्यातूनच फोडाफोडीमुळे निर्माण झालेले नरेटिव्ह दूर करण्यात वैचारिक, बौद्धिक आघाडीवर अग्रेसर असलेल्या संघाची मदत झाली. पांढऱ्या मिशांचा संघ, अशी पूर्वी संघाची ओळख होती. भागवत यांनी म्हटल्याप्रमाणे संघाने सरासरी वय 28 पर्यंत खाली आणले. आज संघ हे जगातील सर्वांत मोठे संघटन असून, त्याचा भाजपला फायदा झाल्याच्या भागवत यांच्या विधानात नक्कीच तथ्य आहे. मात्र, सत्तेचे श्रेय मोदी, शाह यांच्या रणनीतीलाही द्यावे लागेल. मोदी आणि शाह यांची जोडी गुजरातच्या राजकारणात आधीपासूनच प्रसिद्ध होती. 1995 मध्ये आलेले सत्ता त्यांनी आजपर्यंत काँग्रेसकडे जाऊ दिलेली नाही. 2014 मध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यानंतर देशात सर्वदूर पक्षाचा प्रचंड विस्तार करण्यात या जोडीचा मुख्य वाटा राहिला आहे. साम, दाम, दंड, भेद, अनाकलनीय प्रचार तंत्र, पॉवरफुल्ल यंत्रणा, नरेटीव्ह सेट करण्यातील हातखंडा, तपास यंत्रणांचा वापर, अशी सर्व आयुधे पूर्ण क्षमतेने वापरण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. मुळात मोदी यांनी देशभरात आपले नेतृत्व प्रस्थापित केले. शिवाय सर्व पक्ष व त्यातील नेत्यांना फोडून भाजपात विलीन करण्याचा प्रयोगही कमालीचा यशस्वी करून दाखवला. हे बघता संघाचे जाळे आणि मोदी-शाहांचे राजकारण या दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक दिसतात. म्हणूनच शतप्रतिशतचे श्रेय दोघांनाही द्यावे लागेल.