उत्तराखंडमध्ये अडकलेले महाबळेश्वरमधील पर्यटक सुरक्षित
महाबळेश्वर :
उत्तराखंड जिल्हा उत्तरकाशी येथे काल दि. 30.06.2025 रोजी सिलाईबंद या ठिकाणी अतिवृष्टिमुळे चारधाम रस्ता वाहून गेला असल्याने, भारतातले 777 पर्यटक अडकले होते. त्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील झांझवड येथील 6 पर्यटक अडकले होते. या अडलेल्या पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला. हे सर्व पर्यटक सुरक्षित आहेत.
उत्तराखंड जिल्हा उत्तरकाशी येथे दि. 30 जून रोजी सिलाईबंद या ठिकाणी अतिवृष्टिमुळे चारधाम रस्ता वाहून गेला असल्याने महाराष्ट्रातील सर्वसाधारणपणे 150 पर्यटक अडकले आहेत. झांझवड (ता. महाबळेश्वर) येथील 6 पर्यटकांचा यामध्ये समावेश असून ते सध्या बडकोट येथे सुखरुप असल्याची माहिती घेतली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झांझवड येथील पर्यटक आकाश जाधव यांच्याशीही भ्रमणध्वनीवरुन संवाद साधला. तेथील परिस्थिती बद्दल माहिती घेतली. प्रशासनाने केलेल्या मदतीबद्दल जाणून घेतले. काही अडचण असल्यास त्वरित संपर्क साधण्याबाबत सांगितले. महाराष्ट्रातील पर्यटकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांच्याशीही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित महाराष्ट्रात पाठविले जाईल, असे सांगितले. उत्तराखंड येथील स्थानिक प्रशासन सहकार्य करीत असून महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.
उत्तराखंडमध्ये भारतातले 777 पर्यटक अडकले असून एनडीआएफ, एसडीआरएफ, पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी येथे तैनात करण्यात आले असून रस्ता पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे.
सध्या जानकीचट्टी या ठिकाणी सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. सदर ठिकाणी डॉक्टर, भोजन व राहण्याची व्यवस्था उत्तराखंड सरकारने केली आहे, तसेच भुस्खलन भागातून चालत मार्गस्थ करून पुढे वाहनातून ऋषिकेश पर्यंत उत्तराखंड सरकार व्यवस्था करण्यात येणार असल्याचे दूरध्वनीवरून कळाले. जानकी चट्टी हा भाग दुर्गम असल्याने नेटवर्क संपर्क साधण्यास अडथळा होत असल्याने वायरलेस सेटने संपर्क चालू आहे.