कळंगुटमध्ये पुन्हा पर्यटकांना मारहाण
गंभीर जखमी पर्यटक रोहित मुंबईचा : शॅकच्या पाच कर्मचाऱ्यांना अटक
म्हापसा : कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरील एका शॅकच्यासमोर शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पर्यटकांच्या गटाला मारहाणीची घटना घडली आहे. याप्रकरणी शॅकच्या पाच कर्मचाऱांना अटक करण्यात आली आहे. रोहित दरोलिया हा मुंबईचा पर्यटक जखमी झाला आहे. पर्यटकांना मारहाण करण्याचा प्रश्न राज्यात पुन्हा ऐरणीवर आला असून आठ दिवसापूर्वी बोट दुर्घटनेची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा राज्याचे नाव पर्यटकांना झालेल्या मारहाणीमुळे बदनाम झाले आहे. खासकरून कळंगुटमध्ये या घटना घडत असल्याने कळंगुट पोलिस तसेच किनारी सुरक्षा पोलिस व पर्यटक पोलिसांचे नाव बदनाम होत आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, उपअधीक्षक विश्वास कर्पे आदी पोलिस अधिकाऱ्यांसमवेत शॅक धारकांची बैठकही झाली असून त्यांना अधीक्षकांनी विविध सूचनाही केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका शॅकच्या कर्मचाऱ्यांकडून मुंबईमधील पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली. यात रोहित दरोलिया (मुंबई) हा गंभीर जखमी झाला आहे. गोमेकॉत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवून पोलिसांनी पाच जणांना अटक केली. अटक केलेल्या संशयितांमध्ये नौफाल पी.टी. (वय 28, रा. केरळ), मूळ हिमाचल प्रदेशमधील रोहित कुमार (वय 27 वर्षे), अभिषेक कुमार (वय 24 वर्षे), विनोद कुमार (वय 31 वर्षे) आणि सुरिंदर कुमार (वय 28 वर्षे) यांचा समावेश आहे. हे संशयित शॅकमध्ये सुरक्षारक्षक आणि वेटर म्हणून कामाला होते. या हल्ल्यात रोहित दरोलिया हा युवक गंभीर जखमी झाला. त्याच्या इतर मित्रांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. जखमींना प्रथम कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल केले. रोहितला तेथून गोमेकॉत हलविले. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच संशयितांना ताब्यात घेतले.
क्षुल्लक कारणावरून वाद
ही घटना गुऊवारी उत्तररात्री 3.30 च्या सुमारास घडली. लुईझा कुतिन्हो यांच्या मालकीच्या शॅकसमोर मुंबईतील सहा पर्यटकांचा गट वाळूमध्ये मौजमस्ती करत होता. येथील सुरक्षा रक्षकाने प्रथम क्षुल्लक कारणावरून या पर्यटकांशी वाद घातला. त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. सुरक्षारक्षकाने शॅकमध्ये जाऊन तिथे झोपलेल्या इतर सहकाऱ्यांना बोलावून आणले. या सर्वांनी पर्यटकांवर हल्ला केला. पोलिसांनी या कर्मचाऱ्यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. सप्टेंबर महिन्यात या शॅकमध्ये गुजरात येथील एका पोलिसाला मारहाण करण्याचा प्रकार घडला होता.
दरम्यान मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार या शॅकचा मालक एका राजकारण्याशी जवळीक साधून असून त्याआधारे या शॅकचे कर्मचारी दादागिरी करून पर्यटकांना मारहाण करीत असल्याचे सांगण्यात आले. “पात्रांव आमकां पळयतोलो”. असे म्हणून हे कर्मचारी येथे दादागिरी करीत असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वीही अशी मारहाणीची बरीच प्रकरणे झाली असून पोलिसात नेल्यावर पोलिस त्यांना समज देऊन हाकलून देतात. तोपर्यंत त्या शॅकच्या मालकाचा पोलिसात फोन जातो. मालकाच्या आशीर्वादानेच येथे हाणामारी होते. मालकांचा कर्मचाऱ्यांवर काहीच कंट्रोल नसल्याचे दिसून येतो.