पर्यटकांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
हणजूण येथे दिवसाढवळ्या ‘जंगलराज’ : बाऊन्सर, वेटर्सकडून मारहाण-छेडछाड,बनारस येथील सात पर्यटक जबर जखमी,पोलिसात दोघांच्याही परस्परविरोधी तक्रार,पर्यटनमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
म्हापसा : पर्यटकांना मारहाण होण्याच्या घटनांमध्ये वाढ होतच असून रविवारी दुपारी असाच प्रकार हणजूण येथील रोमिओ लेन रेस्टॉरंटमध्ये घडला. बनारस येथील एका कुटुंबातील सातजणांना क्षुल्लक कारणावरुन रेस्टॉरंटमधील व्यवस्थापक व बाऊन्सरनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. रक्तबंबाळ होईपर्यंत पर्यटकांना मारहाण करण्यात आली. यावेळी पर्यटक कुटुंबातील काही महिला सदस्यांनाही मारहाण करण्यात आली, तर काहींची छेडछाड करण्यात आल्याची तक्रार त्या कुटुंबाने केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना इस्पितळात उपचारासाठी पाठविले आणि बाऊन्सरना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बनारस येथील सुमारे 13 सदस्यीय कुटुंब पर्यटनासाठी 30 ऑक्टोबर रोजी गोव्यात दाखल झाले होते. काल रविवारी दुपारी हे कुटुंब हणजूण येथील रोमिओ लेन रेस्टॉरंट क्लबमध्ये जेवणासाठी गेले होते. तेथे टेबल व जेवणाच्या क्षुल्लक कारणावरुन त्यांचा हॉटेल व्यवस्थापकाशी वाद झाला. त्याचे रुपांतर भांडणात होऊन व्यवस्थापकाने बाऊन्सरना बोलवून घेतले आणि मारहाण केली. यावेळी झालेल्या धक्काबुकीत बाऊन्सरनी आमच्या कुटुंबसदस्यांना जबर मारहाण केली आणि त्यात आमचे सात सदस्य जबर जखमी झाले, अशी तक्रार त्या पर्यटक कुटुंबाने केली आहे.
मारहाणीत पर्यटक जबर जखमी
जखमी पर्यटकांमध्ये आर्यन मिलाभ, युवराज चांडेल, शिवांश सिंग, अक्षयप्रताप सिंग हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. शिवांगी सिंग, आर्या मिलाभ व वैभवी चांडेल यांना प्रथमोपचारानंतर पाठविण्यात आले. हणजूण पोलिसांनी याप्रकरणी सहा बाऊन्सरना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पर्यटक वैभवी चांडेल पत्रकारांना माहिती देताना म्हणाल्या, आम्ही दुपारी या रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेलो. तेथे आमच्या अगोदर टेबलवर बसून गेलेल्या गेस्टच्या प्लेट्स, बाटल्या तशाच होत्या. आमच्यापैकी एकाने प्लेट्स, बाटल्या बाजूला केल्याने त्याच्याशी व्यवस्थापकाने भांडण करुन त्या अगोदरच्या लोकांचे बिल आम्हाला द्यायला सांगितले.
खुर्ची पडल्याने बाऊन्सरकडून मारहाण
आम्ही दिलेली ऑडर्रही आम्हाला वेळेवर दिली नाही. तसेच थंड जेवण दिल्याने वाद वाढला. थंड जेवण पाहिजे तर घ्या, पण बिल भरावेच लागेल, अशी दमदाटी केली. त्याचवेळी रेस्टॉरंटमधील एक खुर्ची खाली पडली, म्हणून व्यवस्थापकाने बाऊन्सरला बोलावून घेतले आणि आम्हाला मारहाण केली, असे पर्यटक वैभवी चांडेल यांनी सांगितले.
वेटरकडून महिलांची छेडछाड
हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, तर तेथील वेटरनी आपली व इतर महिला सदस्यांची छेडछाड केली, असा आरोपही वैभवी चांडेल यांनी केला. आम्ही आमची चूक मान्य करुनही त्यांनी आम्हाला जबर मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यात महिला सुरक्षित नाहीत
गोव्यात महिलांची छेडछाड केली जात असेल, महिला सुरक्षित नसतील तर येथील परिस्थिती दिल्लीसारखी होईल. गोवा पर्यटकांवर अवलंबून आहे, त्यामुळे पर्यटकांची कदर करा, असे त्या महिला पर्यटकांनी पत्रकारांना सांगितले. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांनी या क्लब रेस्टॉरंटवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली.
परस्परविरोधी तक्रार
दरम्यान, आपल्या क्लब रेस्टॉरंटमध्ये येऊन बनारसच्या पर्यटकांनी दंगामस्ती करुन सामानाची मोडतोड केल्याची परस्परविरोधी तक्रार रोमिओ लेन क्लब रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने हणजूण पोलिसांत लेखी दिली आहे. निरीक्षक सुरज गावस यांच्या नेतृत्वाखाली अधिक तपास सुरु आहे.
पोलिसांकडून रात्री उशिरा गुन्हा नोंद
रात्री उशिरा हणजूण पोलिसांनी या हाणामारीबाबत वैभवी मुकूंद चांडेल (रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद केला आहे. रोमिओ लेन रेस्टॉरंटचे व्यवस्थापक अजय कवटीकर याने आपल्या कुटुंबीयांची छेडछाड करुन सुरक्षारक्षक जुनीड अली व इतरांनी मिळून शिवनेश सिंग, युवराज चांडेल यांना लोखंडी रॉड, लाथाबुक्यांनी मारहाण केली. आपण भांडण सोडवायला गेली असता सुरक्षारक्षकांनी थोबाडीत मारले व आपल्या कुटुंबियांना धक्काबुकी करुन मारहाण केली. शिवाय बहीण शिवांगी सिंग हिलाही मारहाण केल्याचे लेखी तक्रारीत म्हटले आहे. हणजूण पोलिसांनी भारतीय दंड संहिता 143/2025 अन्वे 352, 118 (1), 74 अन्वे 3 (5) 2023 अन्वे गुन्हा नोंद केला आहे.