For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोर्तीनमधील पर्यटकांचा उपद्रव रोखणार

07:42 AM Jun 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
कोर्तीनमधील पर्यटकांचा उपद्रव रोखणार
Advertisement

निरीक्षक, कर्मचारी ठेवणार देखरेख : मनपा सर्वसाधारण बैठकीत निर्णय

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून पर्यटन उद्योगाकडे पाहण्यात येत असले तरी काही भागात तेच पर्यटक स्थानिक लोकांना उपद्रवी आणि नको नकोसे वाटू लागले आहेत. राजधानीतील फोन्तेन्हास आणि साओ तोमे या भागात या पर्यटकांच्या उपद्रवामुळे लोक अक्षरश: मेटाकुटीस आले असून त्यावर उपाय म्हणून आता मनपाने तेथे कायमस्वऊपी पालिका निरीक्षक आणि कर्मचारी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ही योजना यशस्वी न झाल्यास अन्य पर्यायांचाही विचार करण्यात यावा, असेही ठरविण्यात आले. मनपाच्या काल शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत हा विषय प्राधान्याने चर्चेस घेण्यात आला व त्यावर वरीलप्रमाणे तोडगा काढण्यात आला.

Advertisement

बैठकीत त्यानंतर शहरातील धोकादायक इमारती पाडणे तसेच मार्केट परिसरात एल दोरादो इमारतीजवळील सील करण्यात आलेली मनपाचीच जुनी इमारत पाडण्याचे काम हाती घेण्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला. सध्यस्थितीत शहरातील सर्वात धोकादायक अशी ही इमारत असून गेल्या कित्येक वर्षांपासून ती जर्जर अवस्थेत आहे. त्यामुळे ती पाडण्यात यावी अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. त्यानुसार हल्लीच पालिकेच्या आदेशानंतर तेथील सर्व दुकाने रिक्त करण्यात आली आहेत. तसेच तेथून बाजारात जाणारी पायवाटही बंद करण्यात आली आहे. सदर इमारत फाल्कन या इमारतीला एकाच भिंतीने जोडून असल्याने पाडण्याची प्रक्रिया अत्यंत किचकटीची आणि तेवढीच धोकादायक ठरणार आहे. या इमारतीत राहणाऱ्या लोकांनी पर्यायी जागेची मागणी करण्यासाठी पालिका आयुक्ताची भेट घेतली होती. परंतु पालिकेने त्यांची मागणी अमान्य केली आहे, असे महापौर रोहीत मोन्सेरात यांनी सांगितले.

पाटो भागात डेंग्यूचे संक्रमण

राजधानीच्या पाटो भागात सध्या डेंग्यू संक्रमण वाढले असून ऊग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यासाठी आरोग्य खात्याच्या सहकार्याने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या संबंधित भागांची पाहणी तपासणी करून अहवाल सादर करावा, तो नंतर  आरोग्य खात्याला पाठवून देण्यात येईल. जनतेच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही, असे मोन्सेरात यांनी सांगितले.

कांपाल मैदानावर डांसाचा प्रादुर्भाव

कांपाल मैदान परिसरातही डासांची पैदास वाढली असून स्थानिकांना मनस्ताप होऊ लागला आहे. या मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साठत असून त्याचा योग्य निचरा होण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, यासाठी क्रीडा खात्याला कळविण्यात येणार आहे.

शहरातील जुनी वाहने हटवून सांतीनेज येथील एमआरएफ शेडच्या भागात स्थलांतरित करण्यासाठी विशेष क्रेन भाड्याने घेण्याचे ठरविण्यात आले. शववाहिका व्हॅन खरेदी करणे, सांतीनेज स्मशानभूमीसाठी संरक्षक भिंतीची पुनर्बांधणी व पावसाच्या पाण्यासाठी निचरा व्यवस्था करणे, मनपाच्या नाईट सॉइल टँकर दुऊस्ती खर्चास मंजुरी देणे, मासे विक्रेत्यांसाठी तात्पुरती शेड उभारणे, ईडीसी पाटो भागात एलआयसी इमारतीसमोरील कचरा व्यवस्थापन सुविधेतील ट्रॉमेल यंत्रासाठी छिद्रित एमएस शीटची दुऊस्ती/बदल करणे यासारख्या विषयांवर चर्चा आणि निर्णय घेण्यात आले.

त्याशिवाय मनपातील प्रशिक्षणार्थी आयटी तंत्रज्ञास सेवावाढ. कायदा सल्ला  देणे, प्रतिज्ञापत्रे तयार करणे आदी कामांसाठी नियुक्त वकिलाच्या व्यावसायिक शुल्कास मंजुरी देणे. मनपाच्या वकिलांच्या पॅनलला मुदतवाढ देणे, असेही अन्य निर्णय घेऊन त्यांना मंजुरी देण्यात आली.

केवळ 15 मिनिटांत आटोपली बैठक

तसे पाहता ही बैठक सरळसरळ एकतर्फीच झाली. विरोधकांपैकी एकही नगरसेवक उपस्थित राहिला नसल्याने बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेतील सर्व मुद्यांना एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यामुळे चर्चेस फारसा वाव मिळाला नाही व जेमतेम 15 मिनीटांतच बैठक आटोपती घेण्यात आली..

Advertisement
Tags :

.