खनिज वाहतुकीच्या पहिल्याच दिवशी पर्यटकाचा बळी
पर्यटक दिल्लीतील विद्यार्थी : धारबांदोडा येथे भीषण अपघात
फोंडा : फोंडा-बेळगांव महामार्गावरील पेटके-धारबांदोडा येथे दुचाकी व खनिजवाहू टिप्पर ट्रकच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेला पर्यटक युवक जागीच ठार झाला. राहूल बन्सल (19, हरियाणा) असे मृत युवकाचे नाव आहे. तसेच दुचाकीचालक शौकन प्रभाकर (19, हरियाणा) हा गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. काल शुक्रवारी दुपारी 12.30 वा. सुमारास हा अपघात घडला. खनिज वाहतूक सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी युवकाचा बळी गेला आहे. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खनिजवाहू ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात युवकाला जीव गमावावा लागला.
सुकतळे येथून आमोणेपर्यंत काल शुक्रवारपासून खनिज वाहतूक सुरू झाली आहे. खनिजवाहू टिप्पर जीए 07 पी 2511 ट्रक खनिजमाल घेऊन आमोणेच्या दिशेने जात होता. नेमका याचवेळी युवकांचा एक गट ‘रेंट अ बाईक’ च्या दुचाकीवरून दूध सागरच्या दिशेने जात होता. त्यातील दुचाकी जीए 03 एजे 4840 ज्युपिटरवर राहुल बन्सल व शौनक प्रभाकर दोघेही जात होते. यावेळी शौनक प्रभाकर याची दुचाकी पाठीमागे राहिली. आपल्या मित्राना गाठण्यासाठी तो वेगाने जात असताना टिप्पर ट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघातात रेंट व बाईकच्या दुचाकीचे दोन तुकडे झाले आहेत. यावेळी राहूल बन्सल हा निपचित पडला होता. पिळ्यो धारबांदोडा येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तसेच दुसरा जखमी शौनक प्रभाकर याला तातडीने गोमेकॉत हलविण्यात आले.
रेंट अ बाईच्या ऑडिटबद्दल संशय
प्राप्त माहितीनुसार दिल्ली टेक्नॉलाजी विद्यापीठाचे हे 7 विद्यार्थी दोन दिवसापुर्वी गोव्यात वागातोर येथे दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी विद्यार्थी चार रेंट अ बाईक घेऊन कुळे येथील दूधसागर धबधब्यावर निघाले होते. यापैकी एक दुचाकी बरीच जुनी आढळल्याने विद्यार्थी नाखुष होते. नेमक्या त्याच दुचाकीचा अपघात झाला. तसेच दुचाकीचे दोन तुकडे झाल्याने या व्यवसायिक दुचाकीचे ऑडिट झाले होते की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे रेंट अ बाईक रस्त्यावर चालविण्यासाठी सुरक्षित होती की नाही? यावरही वाहतूक पोलिसांनी कसून चौकशी करणे गरजेचे आहे.
दिल्ली येथून आलेले हे 7 मित्र स्कुटर घेऊन कुळे येथे जात असताना फोंडयात एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबल्याची माहिती मिळाली. तसेच प्रथम ती दुचाकी राहूल बन्सल चालवित होता, त्यानंतर शौनक प्रभाकर दुचाकी चालविण्यासाठी घेतली. गोव्यातील रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला की बेदरकार खनिज वाहत्रतुकीमुळे हा 19 वर्षीय विद्यार्थ्यांचा बळी गेला, याप्रकरणी फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहे. दरम्यान याप्रकरणी टिप्पर ट्रकचालक रामा वडार (सिद्धेश्वरनगर उसगांव) याला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.