निपाणीतील पर्यटक आंबोलीत दरीत कोसळला
त. भा. वार्ताहर
आंबोली : आंबोली महादेवगड पॉईंट येथे निपाणी येथील एक पर्यटक मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास 600 फूट खोल दरीत कोसळला. डॉ. आयुब सय्यद (वय 45 वर्षे, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. निपाणी येथून दहाजण पर्यटनासाठी येथे आले होते.
या सर्वांनी बाकी पर्यटन पॉईंट पाहून झाल्यावर महादेवगड येथे जाण्याचे ठरविले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते महादेवगड पॉईंटवर आले. सर्वजण एका बाजूला फोटो काढत होते. त्यावेळी डॉ. आयुब हे एका बाजूने रेलिंगवर चढून दरीच्या बाजूने खाली उतरले. त्यावेळी त्यांचा पाय घसरून ते सहाशे फूट खोल दरीत कोसळले. ही घटना त्या ठिकाणी मक्याची कणसे विकणाऱ्या तरुणाने त्यांच्या मित्रांना सांगितली. त्यांनी याची कल्पना आंबोली पोलीस दूरक्षेत्राला दिली. आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे ठाणे अंमलदार हवालदार संतोष गलोले, लक्ष्मण काळे, सचिन चव्हाण यांनी घटनास्थळी जात माहिती घेतली. यावेळी त्यांनी रेस्क्यू टीमला पाचारण केले. शोधमोहीम सुरूही करण्यात आली.
परंतु, जास्त धुके आणि काळोख असल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश परब, चालक महेश निरवडेकर यांनी घटनास्थळी जात माहिती घेतली. रात्र झाल्याने पोलीस निरीक्षक मगदूम यांनी शोध मोहीम थांबवून बुधवारी सकाळी साडेसहा वाजता शोध मोहीम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना केल्या.
मिळालेल्या माहितीनुसार जत्राट येथून चालक सुनिल सदाशिव पाटील (35), आयुब सय्यद (45), दीपक प्रकाश पठारे (43), किशोर अशोक तावदारी (40), राजेंद्र मधुकर कोकणे (45), शिवानंद सुभाष धारकोड (40), अजित सुधाकर पठारे (40), सुकुमार सुधाकर कुन्नुरे (42), संतोष अण्णासो फटिंग (42), संतोष अण्णासो पाटील (40, सर्व राहणार जत्राट) हे दहाजण आंबोलीत पर्यटनाला आले होते.