मातीशी नाळ जोडणारे पर्यटन
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
या घरात फरशी नाही पण घर शेणाने स्वच्छ सारवलेले आहे. या घराला दिवाणखाना, त्यात खुर्च्या, समोर टीव्ही नाही. पण घराला झावळ्याने झाकलेले गुळगुळीत अंगण आहे. या घरात नळाने पाणी येत नाही. पण परसातील विहिरीचे गोड पाणी उन्हाळ्यातही कधी कमी होत नाही. या घरात भिंतीवर कसलीही सजावट नाही. पण घरातील गुळगुळीत मातीच्या भिंती सारवलेली जमीन व दारातील ठिपक्याची रांगोळी याची सर किमती सजावटीलाही येत नाही. आणि या घरात जेवणासाठी स्टीलची ताटे वाट्या नाहीत. पण पळसाच्या पानाच्या पत्रावळीत वाढल्या जाणाऱ्या जेवणाचा स्वाद माणूस कधीच विसरत नाही.
यामुळेच वाड्या वस्तीवरच्या या छोट्या छोट्या घरात रोज पाहुण्यांची वर्दळ वाढली आहे. थ्री स्टार फाईव्ह स्टार अशा पर्यटना बरोबरच या वाड्या वस्तीवरच्या पर्यटनाची एक नवी क्रेझ कोल्हापूर कोकण परिसरात वाढली आहे. आणि त्याला खूप मोठा असा प्रतिसाद मिळत आहे. आधुनिक जगातही ‘मातीशी नाळ जोडणारे पर्यटन’ अशी त्याची ओळख झाली आहे .
अगदी एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर, कोल्हापूर जिह्यातील भुदरगड तालुक्यात रांगणा किल्ल्याच्या अलीकडे तीन चार किलोमीटर अंतरावर चिकेवाडी हे गाव आहे. हे गाव म्हणजे त्या बाजूचे कोल्हापूरचे शेवटचे टोक. या गावाला अजूनही एसटी येत नाही. कारण भटवाडी या एका मोठ्या गावापासून चिकेवाडीचा आठ किलोमीटरचा रस्ता जंगलाचा आहे. या गावात सातच घरी आहेत आणि लोकसंख्या अवघी 21 आहे. गावातले तरुण छोट्या छोट्या रोजगाराच्या निमित्ताने कोल्हापूर, सांगली, पुणे मुंबईला नोकरीला आहेत. त्यामुळे गावात तसा शुकशुकाटच आहे. पण आता या गावात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. त्याचे कारण इथली निरव शांतता, छोटी छोटी घरे, घरासमोरचे मस्त अंगण, तुळशी वृंदावन, अजुबाजुला झाडी, घरातल्या खोल्या शेणाने सारवून गुळगुळीत केलेल्या. त्यामुळे या घरात एक अदृश्य जाणवणारा थंडावा आहे. अंगणात रात्री झोपले की आकाशात डोळ्यासमोर विस्तीर्ण असे तारांगण पसरलेले आहे. वाहनांचा आवाज नाही.
हॉर्नचा गोंगाट नाही, त्यामुळे आपला रोजचा सारा व्याप विसरून टाकणारे इथले सारे वातावरण आहे. तिथे जेवणाचाही फारसा खर्च नाही. आणि प्लेट सिस्टीम वगैरे भानगडच नाही. मांसाहारी जेवणात तांदळाची भाकरी, मटन , रस्सा, कांदा, पांढरा भात आणि शाकाहारीत वांगे, वरण्याच्या शेंगा, शेवग्याची आमटी, ताक, कुरवड्या सांडगे असे पदार्थ. एरव्ही प्लेट सिस्टीम मधील चरचरीत खाण्याची सवय असलेलेही इथल्या जेवणावर अक्षरश: फिदा होतात पोटभर जेवतात आणि अंगणात खाली काहीही न अंथरता गार वाऱ्या झोपी जातात. आपण आधुनिकतेच्या नावाखाली असल्या नैसर्गिक सुखाला आजवर का म्हणून मुकलो होतो असा सकारात्मक विचार करतात. चिकेवाडीतले लोक व्यावसायिक नाहीत. पण पर्यटकांनी विनंती केली तर त्यांची राहण्याची व्यवस्था आहे त्या परिस्थितीत करतात. अल्पसे शुल्क घेतात .पण अमूल्य असा एक जगण्याचा अनुभव देऊन जातात.
अशाच प्रकारे शाहूवाडी, राधानगरी, आजरा, पन्हाळा, चंदगड, गगनबावडा तालुक्यातील काही वाड्या वस्तीतील तरुण अशा पर्यटनासाठी आता पुढे येत आहेत. आणि पर्यटकांच्या राहण्याची जेवणाची सोय करत आहेत. या अनोख्या पर्यटनाचा लाभ शहरी भागातील लोक आनंदाने घेत आहेत. एरवी गादी उशी रजई, पंखा याशिवाय पाठ न टाकणारे इथे जमिनीवर आनंदाने पाठ टेकत आहेत. भाकरी रश्श्यावर ताव मारत आहेत. रात्री अंगणात मैफिली रंगवत आहेत. लहान मुले महिलांनाही हे पर्यटन खूप सुरक्षित आहे. आधुनिकतेत वाढलेली मुलेही बघता बघता अशा वातावरणात रमत आहेत. त्यानिमित्ताने चला खेड्याकडे हा संदेश काही प्रमाणात का होईना वास्तवात आला आहे. पुण्या मुंबईत हॉटेललात रोजगार शोधण्यापेक्षा तरुण वर्ग आपापल्या गावात वाड्या वस्तीतच पर्यटकांना आमंत्रण देत आहे. त्यांना आपल्या परीने सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत. राधानगरी तालुक्यात दाजीपूर परिसरात तर तिथल्या तरुणांनी जीप किंवा प्रवासी वाहने घेऊन लोकांना जंगल सफारीचा आनंद देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी नेचर क्लब सुरू केले आहेत. पुस्तकातल्या अभ्यासाकापेक्षा वास्तव असे निसर्गदर्शन ते पर्यटकांना घडवत आहेत. वाड्या वस्तीवरच्या या पर्यटनाची क्रेझ नक्कीच वाढली आहे. आणि कोणत्याही आधुनिक सुविधा शिवाय लोक पर्यटनाचा आणि त्या निमित्ताने निसर्गाचा आनंद अनुभवत आहेत. कोल्हापूर जिह्यात पन्हाळा, राधानगरी, आजरा, गगनबावडा, भुदरगड, शाहुवाडी हे सहा तालुके डोंगरी आहेत. तेथे आजही वाड्यावस्ती वरचे जीवन आहे. ते जीवन अनुभवताना निसर्गाच्या कुशीत एक-दोन दिवस का होईना राहण्याची संधी अशा पर्यटनामुळे आपल्याला मिळत आहे.